नागपूर : मागील महिन्यापर्यंत नियंत्रणात असलेली कोरोनाबाधितांची संख्या आता झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी दैनंदिन रुग्णसंख्येने आठ महिन्यांतील उच्चांक गाठत ६९८ पोहचली. विशेष म्हणजे, शुक्रवारी शारजाहून नागपुरात आलेल्या विमानातील ९४ पैकी १५ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनाची तिसरी लाट जेवढ्या वेगाने येईल, तेवढ्याच वेगाने ती कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु २९ नोव्हेंबर २०२१ रोजी २७ रुग्ण आढळून आले असताना १० दिवसांतच रुग्णसंख्या ७००च्या घरात पोहचली. कोरोनाचा हा वेग काळजी वाढविणार आहे. कोरोनाचा दुस-या लाटेत सर्वाधिक रुग्णांची नोंद एप्रिल महिन्यात झाली. त्यानंतर मे महिन्यापासून रुग्णसंख्या ओसरायला लागली. या महिन्यात २६ तारखेला ६८५ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज रुग्णसंख्येने उच्चांक गाठला.
-पॉझिटिव्हिटीचा दर ७.७ टक्के
नागपूर जिल्ह्यात रोजच्या चाचण्यांची संख्या वाढली आहे. मागील २४ तासांत ९०१२ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर ७.७ टक्क्यांवर पोहचला आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९६,०६५ झाली असून मृतांची संख्या १०,१२३ वर स्थिर आहे. आज १३२ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत कोरोनावर मात करणा-या रुग्णांची संख्या ४,८३,८९२ वर गेली आहे.
-शहरात ५९३ तर ग्रामीणमध्ये ८९ रुग्ण
शहरात झालेल्या ५,५४७ चाचण्यांपैकी ५९३ तर ग्रामीणमध्ये झालेल्या ३,४६५ चाचण्यांपैकी ८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्ह्याबाहेरील ४९ रुग्णांचीही यात भर पडली. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,३४८५९, ग्रामीणमध्ये १,४३,६५९ तर जिल्ह्याबाहेरील ५,३७४ झाली आहे.
-अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजाराच्या घरात
दहा दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा अॅक्टिव्ह म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्या १७५ होती. परंतु आता ती वाढून २ हजारांच्या घरात गेली आहे. सध्याच्या स्थितीत शहरात १,७७९, ग्रामीणमध्ये २४६ तर जिल्ह्याबाहेर २५ असे एकूण २०५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
शारजाहहून आलेल्या १५ बाधितांपैकी ११ रुग्ण एकाच घरातील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शारजाह-नागपूर आंतरराष्ट्रीय विमान उतरले. ९४ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली असता १५ प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींचा समावेश आहे. हे कुटुंब महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनअंतर्गत वस्तीमधील आहे. या सर्वांना ‘एम्स’मध्ये दाखल केले आहे.
-