नागपूर : मार्च एण्डचा ताण असतानाच जिल्हा कोषागार कार्यालयात कोरोनाचा झालेल्या उद्रेकामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. १२ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले असून, उपलेखापालाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एक उपलेखापाल अत्यवस्थ स्थितीत असून, व्हेन्टिलेटरवर आहे. ४ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह आढळल्याने तेसुद्धा कार्यालयात नाहीत. त्यामुळे जिल्हा कोषागाराचे काम ठप्प पडल्यागत आहे.
कोषागार कार्यालयात निवृत्तिवेतन, लेखापरीक्षा, संकलन, पीडीपीएलए संबंधाने कामकाजासाठी इतर कार्यालयाचे कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक यांची रोजच गर्दी होते. मार्च महिना असल्याने ही गर्दी आणखी वाढत चालली आहे. सध्याच्या परिस्थितीत कार्यालयात मनुष्यबळ फारच कमी आहे. त्यातच मार्च महिन्याचे कोषागारात इतर कार्यालयाचे जवळपास २००० बिले प्रलंबित आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कोषागार कार्यालयास भेट दिली. त्यांनी समस्या जाणून घेतल्या आणि बाहेरील व्यक्तींना अत्यंत महत्त्वाचे कामकाज असल्याशिवाय प्रवेश देऊ नका, असे आदेश दिले. सध्या कोषागारात कामकाजाचा अत्यंत भार आहे. शिवाय भीतीचे वातावरणसुद्धा आहे. त्यामुळे कामकाजाशिवाय कोणत्याही अभ्यागताला कोषागार प्रवेशावर निर्बंध घालण्यात आल्याचे सहसंचालक (लेखा) सुवर्णा पांडे यांनी सांगितले.
- बीएसएनएलची सेवा तीन दिवस होती बंद
बीएसएनएलची इंटरनेट सेवा तीन दिवसांपासून बंद असल्याने निवृत्तिवेतन शाखेतील निवृत्तिवेतन कामकाजाची वेबसाईट बंद होती. त्यामुळे निवृत्तिवेतन कामकाजासंबंधीचे कामकाज होऊ शकले नाही.