नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवातीच्या टप्प्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिसाद असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच ८० ते ९० टक्क्यांवर लसीकरण होऊ लागले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत दिलेल्या १९ हजार ७१७ लसीकरणाच्या लक्ष्यापैकी १५ हजार ३१८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. याचे प्रमाण ७८ टक्के आहे. १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘बुस्टर डोस’लाही प्रतिसाद वाढला असून ९०० लाभार्थ्यांनी लस घेतली.
नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शहर व ग्रामीण मिळून सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीचे १ लाख २९ हजार; तर भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे ५ हजार २०० डोस असे एकूण १ लाख ३४ हजार २०० डोस मिळाले. सुरुवातीला या दोन्ही लसींबाबत गैरसमज होते. विशेषत: कोव्हॅक्सिन लसींच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा सुरू असल्याने व ज्या लाभार्थ्यांना ही लस दिली जात होती त्यांच्याकडून संमती पत्र लिहून घेतले जात असल्याने ४० टक्क्यांच्याही खाली प्रतिसाद होता. मात्र बाधितांची संख्या वाढताच लसीकरणाच्या टक्क्यातही वाढ झाली. सध्याच्या स्थितीत दोन्ही लस मिळून १ लाख १७ हजार ९८२ डोस विविध लसीकरण केंद्रांकडे जमा आहे. पहिल्या टप्प्यात ‘को-विन’ अॅपमध्ये नोंद न झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे लवकरच नोंदविले जाणार असून, त्यांनाही लसीकरणात समावेश केला जाणार असल्याची माहिती आहे. सध्या फ्रंटलाईन हेल्थ वर्कर, आरोग्य कर्मचारी, पोलीस व महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे.
- नातेवाईक, मित्रांचेही लसीकरण
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व रुग्णालयांच्या नावांची यादी मागितली. यात काही खासगी हॉस्पिटलनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबतच नातेवाईक, मित्रांना हॉस्पिटलचे कर्मचारी दाखवून त्यांची नावे पाठविली. यातील काहींचे लसीकरण झाल्यानंतर त्यांनी आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयाकडे या संदर्भात तक्रारी दाखल झाल्या आहेत. परंतु अद्याप कोणावर कारवाई झाली नाही.
लसीकरणाला गती
सुरुवातीला लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये काही गैरसमज होते. नंतर ते दूर होताच लसीकरण वाढले. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन हेल्थ वर्कर, पोलीस यांना लस दिली जात आहे. काही केंद्रावर तर १०० टक्के लसीकरण होत आहे.
-डॉ. देवेंद्र पातुरकर
जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर