नागपूर : मागील काही दिवसांपासून स्थिरावलेल्या कोरोनाचे रुग्ण व मृत्यूच्या संख्येत शुक्रवारी घट आली. नागपूर जिल्ह्यात २८ रुग्ण आढळून आले. यात शहरातील २२ तर ग्रामीणममधील ६ रुग्ण होते. विशेष म्हणजे, पाच दिवसानंतर आज पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,७६,९४४ तर मृतांची संख्या ९०२३ वर पोहचली. कोरोनातून १०६ रुग्ण बरे झाले असून याचा दर ९८ टक्के झाला.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. १९ जून रोजी पहिल्यांदाच सर्वात कमी, १६ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर ३०वर रुग्णसंख्या गेली असताना आज पुन्हा ती कमी झाली. सहा दिवसांपासून शहर व ग्रामीणमध्ये एकाही कोरोनाबाधिताचा बळी गेला नाही. नागपूर जिल्ह्यात ६,७१५ आरटीपीसीआर तर १,२४६ रॅपीड अँजिटेन असे एकूण ७९६१ तपासण्या करण्यात आल्या. यात शहरातील ६,५४९ तपासण्यातून ०.३३ टक्के तर ग्रामीणमध्ये १,४१२ तपासण्यातून ०.४२ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत शहरातील ३,२७,१५१, ग्रामीणमधील १,४०,२३२ असे एकूण ४,६७,३८३ रुग्ण बरे झाले आहेत.
-३० लाखांवर तपासण्या
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भावाला मार्च २०२०पासून सुरूवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत या १६ महिन्यात ३०,२९,५४४ संशयित रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. यातून ४,७६,९४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, आज एम्समध्ये तपासण्यात आलेल्या ९१० तर नीरीमधील ६३ नमुन्यांमधून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. मेयोच्या ५३९ तर खासगीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ३५५१ नमुन्यांमधून प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला.
:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ७९६१
शहर : २२ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ६ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७६,९४४
ए. सक्रिय रुग्ण : ५३८
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६७,३८३
ए. मृत्यू : ९०२३