नागपूर : कोरोना रुग्ण व मृत्यूच्या संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. शनिवारी २५ रुग्ण व शून्य मृत्यूची नोंद असताना, रविवारी १६ रुग्ण व २ मृत्यूची भर पडली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७७,३३१ झाली असून ९०३४ रुग्णांचे बळी गेले आहेत. आज २८ रुग्ण बरे झाले. कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८.०८ टक्के नोंदविण्यात आले.
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असलीतरी तिसऱ्या लाटेची धास्ती सतावत आहे. कोरोनाचा ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा धोका पाहता निर्बंध कठोर केले आहेत. परंतु सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखण्याला कोणी गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. रविवारी नागपूर जिल्ह्यात ८२६५ तपासण्या झाल्या. पॉझिटिव्हीटीचा दर ०.१९ टक्के होता. शहरात ६८८३ तपासण्यामधून ६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्हीटीचा दर आतापर्यंतचा सर्वात कमी, ०.०८ टक्के होता. ग्रामीणमध्ये १३८२ तपासण्यामधून ९ रुग्णांची नोंद झाली व एका रुग्णाचा मृत्यू झाला. पॉझिटिव्हीटीचा दर ०.६५ टक्के होता.
-नमुने निगेटिव्ह येण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांवर
दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. मागील आठ दिवसांपासून २५च्या आत रुग्ण आढळून येत आहे. त्या तुलनेत तपासण्यांची संख्या पाच ते आठ हजार होत आहेत. यामुळे नमुने निगेटिव्ह येण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांवर पोहचले आहे. विशेष म्हणजे, अनेक चौकात वाहन चालकांना थांबवून ‘आरटीपीसीआर’ केली जात आहे.
:: कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ८२६५
शहर : ६ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ९ रुग्ण व १ मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७७,३३१
ए. सक्रिय रुग्ण : १४०
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६८,१५७
ए. मृत्यू : ९,०३४