नागपूर : सरकारी रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता भरती असलेले कोरोना रुग्ण पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे अशा घटना सर्वाधिक घडल्या आहेत. येथील एक कोरोनाग्रस्त महिला शनिवारी पळून गेली. परंतु, रुग्णालय प्रशासनाला बराच वेळ हे कळले नाही. त्यामुळे पोलिसांना माहिती देण्यास विलंब झाला. लोकमतने रविवारी मेयो प्रशासन व पोलिसांकडून या माहिलेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच ठोस उत्तर दिले नाही. अशा घटनेनंतर पोलिसांना माहिती दिली जाते. रुग्णांना शोधून काढणे रुग्णालय प्रशासनाचे काम नाही. प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवणे शक्य नाही असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. पोलिसांनीही ठोस माहिती दिली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकलमधूनही अनेक कोरोना रुग्ण पळून गेले आहेत. ते रुग्ण कुठे गेले याची माहिती रुग्णालय प्रशासन व पोलीस यापैकी कुणालाही नाही.
------------
एक आठवड्यात तीन घटना
सूत्रांच्या माहितीनुसार, मेयोमधून एक आठवड्यात तीन कोरोना रुग्ण पळून गेले. त्यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील व छिदवाडा येथील रुग्ण पळाला होता. एक रुग्ण नंदनवन येथे मृतावस्थेत मिळून आला होता. यासंदर्भात रुग्णालय कर्मचारीही काहीच सांगत नाहीत.
-------------
सामान्य नागरिकांना चिंता
रुग्णालय प्रशासन यासंदर्भात गंभीर नसले तरी, या घटना सामान्य नागरिकांची चिंता वाढवणाऱ्या आहेत. कोरोना संक्रमण वेगात वाढत आहे. या परिस्थितीत कोरोना रुग्ण रुग्णालयामधून पळून जाणे नागरिकांसाठी धोकादायक आहे.