नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असताना शनिवारी अचानक २४ रुग्णांची भर पडली. सलग २० दिवसानंतर रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९२,८८५ झाली. दिलासादायक बाब म्हणजे, चार दिवसांपासून मृत्यूची नोंद नाही. मृतांची संख्या १०,११६वर स्थिर आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येतील चढउतार जुलै महिन्यात दिसून आले. या महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या तीन दिवसांत ४० वर रुग्णांची नोंद होती. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने घट आली. १० जुलै रोजी २५ रुग्ण असताना २५ जुलै रोजी सर्वात कमी, ३ रुग्ण आढळून आले. मागील तीन दिवसांपासून १०च्या आत रुग्णसंख्या होती. परंतु शनिवारी दुपटीने वाढ झाली. आज ७,३५४ नमुने तपासण्यात आले. पॉझिटिव्हीटीचा दर ०.३२ टक्के होता. शहरात तपासण्यात आलेल्या ६,५४२ नमुन्यामध्ये १७ तर ग्रामीणमध्ये तपासण्यात आलेल्या ८१२ नमुन्यांमध्ये ७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज नोंद झालेल्या बाधितांच्या तुलनेत कमी, ११ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७.९१ टक्क्यांवर आले आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढून २०६ झाली. यातील १४० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ६६ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत.