लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार नागपूर शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना उपचार व भरती होण्यासाठी मदत व्हावी, तसेच अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयाच्या सहाव्या माळ्यावर सेंट्रल कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून कोरोना रुग्णांना उपचाराचा सल्ला, रुग्णालयात भरती होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे. रुग्णालयात भरती करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी एक-दोन दिवसात रुग्णांना भरती होण्यासाठी ओटीपी क्रमांक दिला जाईल. त्यानुसार संबंधित रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेतले जाणार असल्याची माहीती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. समर्पित सॉफ्टवेअरद्वारे बेड बुक करून संबंधित सर्व माहिती व ओटीपी रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाला कळविली जाईल. ओटीपी दोन तास वैध राहील. या वेळेत रुग्ण भरती न झाल्यास संबंधित बेड रिक्त घोषित करून दुसऱ्या रुग्णास दिला जाईल. एखादा रुग्ण गंभीर असल्यास रुग्णालये त्याला भरती करून तातडीने उपचार सुरू करू शकतील. परंतु याबाबत फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित रुग्णालयावर कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल. यामुळे रुग्णांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
....
सहा डॉक्टर, २४ कर्मचारी नियुक्त
कंट्रोल रूम सर्व दिवशी २४ तास कार्यरत आहे. कंट्रोल रूम पथकाची सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० व रात्री १० ते सकाळी ६ अशा तीन पाळीमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक पाळीमध्ये दोन डॉक्टर, दोन अधिकारी व आठ कर्मचारी अशा प्रकारे सहा डॉक्टर, सहा अधिकारी व २४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
...
व्हॉट्सअॅपवरील रिपोर्टवरून उपचाराचा सल्ला
कंट्रोल रूमकरिता स्वतंत्र फोन क्रमांक व व्हॉट्सअॅप सुविधा असणारे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपवर कोरोना रुग्णाचा आरटीपीसीआर अहवाल, एचआरसीटी अहवाल इत्यादी माहिती घेऊन कंट्रोल रूममधील डॉक्टर उपचाराचा सल्ला देतील. रुग्णालयात भरती करणे आवश्यक असल्यास उपलब्ध बेडची माहिती दिली जाईल. रुग्णाच्या इच्छेनुसार शासकीय की खासगी बेड हवा आहे, त्यानुसार संबंधित हॉस्पिटलला रुग्णाला हलविले जाईल.
....
औषध व ऑक्सिजनचे नियोजन
कंट्रोल रूम ऑक्सिजन वितरण तसेच रेमडेसिविर, टोसिलिझुमाब इत्यादी औषधांचे कोरोना रुग्णालयांना समान वितरण करणार आहे. मागणीनुसार औषधांचा पुरवठा केला जाईल.
...
असे आहेत संपर्क क्रमांक
१ - कोरोना बेड मिळविण्यासाठी : ०७१२-२५६७०२१, ७७७००११५३७, ७७७००११४७२़
२ - कोरोना औषधे व ऑक्सिजन मिळविण्यासाठी : ०७१२-२५५१८६६, ७७७००११९७४