नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात आतापर्यंत १६१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत ९३,२४६ रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात २,५९८ रुग्णांची भर पडली तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण केंद्राच्या अभावामुळे ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने दिवसागणिक मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि पर्याप्त आरोग्य सुविधेच्या अभावामुळे आता आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर आली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
नरखेड तालुका
नरखेड शहरापेक्षा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. तालुक्यात आतापर्यंत ४,०८३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक संक्रमण मन्नाथखेडी या गावात झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात एक कोविड केअर सेंटर असून, येथे साधे बेड्स ४० तर ३ ऑक्सिजन बेड आहेत. ऑक्सिजन बेड्ससाठी तालुक्यात मारामार आहे. जलालखेडा, मोवाड, भारसिंगी जामगाव (खु.) सिंजर, मायवाडी रानवाडी येथील रुग्णांना नागपूर, वरुड, अमरावती येथे ऑक्सिजन बेडसाठी भटकंती करावी लागत आहे.
कुही तालुका
कुही तालुक्यात आतापर्यंत २,९५२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यात वेलतूर येथे सर्वाधिक १६८ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यातील ११५ गावापर्यंत रुग्णांची नोंद झाली असून, ६२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोविड सेंटर केवळ नावापुरतेच आहे. ४० बेडची सुविधा असलेल्या या सेंटरवर ऑक्सिजनयुक्त बेडचा अभाव आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरही तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. येथील रुग्णांना सिटीस्कॅनसाठी नागपूरशिवाय पर्याय नाही. तालुक्यात आतापर्यंत १० रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. शासनदरबारी मृतसंख्या ६२ असली तरी तालुक्यात मृत्यूचे प्रमाण २०० च्या घरात आहे. काही रुग्णांचे घरीच मृत्यू होत आहेत.
काटोल तालुका
काटोल तालुक्यात आतापर्यंत ६,७२३ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या तालुक्यात २,२२४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तालुक्यात सर्वाधिक १३८ रुग्णांची नोंद कोंढाळी येथे झाली आहे. तालुक्यात १६३ पैकी १०२ गावात कोरोनाचे संक्रमण झाले आहे. काटोल शहरात धन्वंतरी व शुअरटेक आणि काटोल ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा उपचारासाठी कमी पडत आहे. गोंडीमोहगाव, माळेगाव, मूर्ती, पारडसिंगा, वाई, कलंभा, येनवा आदी गावातील रुग्णांची ऑक्सिजन बेडसाठी धावाधाव सुरू आहे.
नागपूर ग्रामीण तालुका
नागपूर शहरातील वाढत्या प्रादुर्भावाचा फटका शहरालगतच्या ग्रामीण भागात अधिक बसतो आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यात आतापर्यंत ११,८३८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तालुक्यात सर्वाधिक संक्रमण वाडी नगर परिषद क्षेत्रात झाले आहे. येथे आतापर्यंत ३,५७७ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात १३९ पैकी १२२ गावात कोरोनाचे संक्रमण झाले आहे. यात २३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात शिरपूर भुयारी, शिवा सावंगा, सोनेगाव लोधी, ब्राह्मणी आदी गावातील कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन बेडसाठी धावाधाव करावी लागत आहे.
रामटेक तालुका
रामटेक तालुक्यात आतापर्यंत ४,६१९ रुग्णांची नोंद झाली. सध्या तालुक्यात २,१९५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तालुक्यात रामटेक शहरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. शहरात आतापर्यंत ५११ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअरमध्ये ६० साधे तर ६५ ऑक्सिजन बेड आहेत. मात्र तालुक्यातील देवलापार, करवाही, पवनी, मनेगाव टेक, फुलझरी आदी गावात योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्ण त्रस्त आहेत.