नागपूर : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी पुन्हा दैनंदिन रुग्णसंख्येने २ हजारांचा टप्पा ओलांडला. २,१५० नव्या रुग्णांची भर पडल्याने धास्ती वाढवली. तर, जिल्ह्याबाहेरील १ रुग्णाचा मृत्यूचीही नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ५,०६,७८७ झाली असून मृतांची संख्या १०,१२९वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत ४०० ते ६०० नव्या रुग्णांची भर पडत आहे. परंतु त्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी आहे. शुक्रवारी रात्री एका महिला रुग्णाच्या मृत्यूची नोंद कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आज घेण्यात आली. ही महिला गुजराथ येथून नागपुरात आली. तिला शुक्रवारी रात्री गंभीर अवस्थेत मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु पुढील दोन तासांतच तिचा मृत्यू झाला. आज तिचा आरटीपीसीआरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्याबाहेरील रुग्णांच्या मृत्यूची संख्या १,६२८ झाली आहे. हीच संख्या शहरातील ५,८९७ तर ग्रामीणमधील २,६०४ आहे.
-शहरात १,६६९ तर ग्रामीणमध्ये ३९२ पॉझिटिव्ह रुग्ण
नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत ११,५७३ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे प्रमाण १८.६ टक्क्यांवर गेले आहे. यातील शहरात झालेल्या ८,९४९ चाचण्यांमधून १,६६९ तर ग्रामीणमध्ये झालेल्या २,६२४ चाचण्यांमधून ३९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्ण आहेत. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,५१,०३६ झाली असून ग्रामीणमधील रुग्णांची संख्या १,४८,२८९ वर गेली आहे. आज शहरातील १२८, ग्रामीणमधील ५३३ तर जिल्ह्याबाहेरील ३४ असे एकूण ६९५ रुग्ण बरे झाले.
-१५ दिवसांत अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत ९६ टक्क्यांनी वाढ
नागपूर जिल्ह्यात १ जानेवारी रोजी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२१ असताना १५ दिवसांत ती वाढून ९,८१४ वर पोहचल्याने धाकधूक वाढली आहे. तब्बल ९६.७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात शहरातील ८,००२, ग्रामीणमधील १,६५२ तर जिल्ह्याबाहेरील १६० रुग्ण आहेत. सध्या शासकीय विविध खासगी व संस्थात्मक विलगीकरणात एकूण २,५२९ रुग्ण भरती असून ७,२८५ रुग्ण होम आयसोलेशन आहेत.