लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या आदेशानुसार कोरोना योद्धाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाखाचा अपघात विमा देण्याची घोषणा केली होती. परंतु कोेरोनाचा उद्रेक असताना आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना महापालिकेतील २५ सफाइं कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी अपघात विम्यासाठी केलेले अर्ज शासनस्तरावर नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
नागपूर शहरात दररोज हजार ते दीड हजार कोरोना रुग्ण आढळत होते. यात अनेकांचे बळी गेले. कोरोनाबाधितांना क्वारंटाईन सेंटरवर पोहोचविणे, त्यांना जेवण, पाणी व आवश्यक सुविधा पुरविणे, कोरोनामुळे मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणे अशा स्वरूपाची जोखमीची कामे मनपातील सफाई कर्मचारी करीत होते. यात २५ सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्या वारसांनी अपघात विमा रकमेसाठी सादर केलेले प्रस्ताव निकषात बसत नसल्याचे कारण पुढे करून फेटाळले आहेत.
मनपा प्रशासनाने मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले नाही. तसेच मृतांच्या वारसांना मनपा नोकरीत समावून घेतले नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेश सचिव विक्की बढेल यांनी दिली. शहीद कोरोना योद्धांच्या वारसांना न्याय न दिल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही बढेल यांनी दिला आहे.
प्रस्ताव फेटाळण्याची अशी दिली कारणे
- महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या पत्रानुसार प्रकरण अपात्र आहे.
- विभागप्रमुखांकडून प्रस्ताव आलेला नाही.
-विमा योजनेबाबत शासनाकडे पाठविण्यात आलेले नाही.