नागपूर : नागपूरवरून बेलाकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमध्ये वाहकासह बहुतांश प्रवाशांनी मास्क घातला नाही. यामुळे कोरोनाचा प्रसार कसा होणार नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
एसटी महामंडळाची बस क्रमांक (एमएच ४०, एन-८६५१) सायंकाळी ५.१५ वाजता बसस्थानकावरून बेलाकडे निघाली. या बसमध्ये ८५ ते ९० प्रवासी खचाखच भरले होते. यातील ४० ते ४५ प्रवासी बुटीबोरीचे, तर इतर प्रवासी खापरी, अशोकवन, डोंगरगाव, सातगाव व बोरखेडी येथील होते. बसमधील वाहकानेसुद्धा मास्क घातला नव्हता. एसटी बसेसवर मास्क नाही, तर प्रवेश नाही असे घोषवाक्य लिहिण्यात येते. परंतु बेला येथे जाणाऱ्या या बसमधील ७० टक्के प्रवासी मास्क घातलेले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वाहकावर कारवाई करून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
.........