नागपूर : जानेवारी महिन्यात सुरू झालेली कोरोनाची तिसरी लाट महिन्याभरातच ओसरली. या महिन्यात ६७ हजार ५१४ रुग्ण व १२७ मृत्यूंची नोंद झाली. मार्च महिन्यात तर दैनंदिन रुग्णांची संख्या २५च्या आत आली आहे. ही लाट ओसरल्याने निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, याच दरम्यान कानपूर आयआयटीच्या संशोधकांनी चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. जून-जुलैमध्ये या लाटेला सुरूवात होऊन चार महिने ही लाट राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
काय सांगते कानपूर आयआयटीचे मॉडेल?
कानपूर आयआयटीच्या संशोधकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लावलेला अंदाज काहीअंशी खरा ठरला होता. यामुळे त्यांनी वर्तविलेल्या चौथ्या लाटेच्या अंदाजाला गंभीरतेने घेतले जात आहे. त्यांच्यानुसार, २२ जूनपासून ही लाट सुरू होऊन २४ ऑक्टोबरपर्यंत राहू शकते. १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ही लाट शिगेला पोहोचू शकते. ही लाट किती प्राणघातक असेल, तिची तीव्रता किती असेल, हे कोरोनाचा प्रकार व लसीकरणावर अवलंबून असणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
- लसीकरणाचा वेग कधी वाढणार?
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १६ जानेवारी २०२१पासून सुरूवात झाली. आतापर्यंत ४२ लाख ८० हजार २५९ लोकांनी पहिला डोस घेतला. परंतु, वर्ष होऊनही दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. ३१ लाख ८९ हजार ३०५ लोकांनीच दुसरा डोस घेतला. प्रीकॉशन म्हणजे तिसरा डोस घेणाऱ्यांचा वेगही मंदावला आहे. आतापर्यंत ९१ हजार १३२ लोकांनीच हा डोस घेतला. कानपूर आयआयटीच्या संशोधकांचा अंदाज खरा ठरला तर तीन महिन्याने चौथी लाट येईल. त्यापूर्वी मंदावलेला लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.