उमरेड तालुक्यात सहा कोटीचे कर्ज वितरित
अभय लांजेवार
उमरेड : मागील खरीपाच्या हंगामापासून शेतकरी कैचीत अडकला आहे. मागील खरीप आणि रबी हंगाम कसाबसा होत नाही तोच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. गावखेड्यात कोरोना पोहोचला. यामुळे शेतमाल विक्रीपासून ते खते-बियाणे खरेदीपर्यंतचा कारभार ठप्प पडला. आता नव्याने खरीपाची तयारी सुरू झाली आहे. अशातच पीक कर्ज देणाऱ्या बँकांमधील अधिकारी-कर्मचारीसुद्धा कोरोनाग्रस्त आहेत. यामुळे यंदाची पीक कर्ज वितरण प्रणालीसुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे.
उमरेड परिसरात एकूण २२ राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज वितरित केले जाते. सोबतच नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्थानिक उमरेड शाखेसह तालुक्यातील पाचगाव, मकरधोकडा, सिर्सी आणि बेला या ठिकाणीसुद्धा पीक कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. यावर्षी १ एप्रिलपासून पीक कर्ज वितरणास प्रारंभ झाला. आतापावेतो तालुक्यातील ४८७ शेतकऱ्यांना ६ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज वितरित केल्या गेले. बहुतांश बँकेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शिवाय काही असंख्य शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत असल्याने पीक कर्ज वितरण फारच कमी होत आहे. महिनाअखेर तसेच पुढील महिन्याच्या सुरुवातीला पीक कर्ज वितरणाचा वेग वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. मागील वर्षी ४,९१७ शेतकऱ्यांना ५३ कोटी ९५ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले होते. जोपर्यंत थकबाकीची रक्कम शिल्लक आहे, तोपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणार नाही. एक तर रकमेचा भरणा अथवा कर्ज नूतनीकरण याशिवाय कोणताही पर्याय शेतकऱ्यांजवळ उपलब्ध नाही.
कर्जमाफीची योजना कधी?
शासनाने यापूर्वी कर्जमाफीच्या योजनेची घोषणा अनेकदा केली. वारंवार नियमावली बदलवीत जाचक अटी लादल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने या योजना फसव्या निघाल्या, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. मागील दोन हंगामापासून कोरोनाचा कठिण काळ लक्षात घेता शासनाने संपूर्ण कर्जमाफीच्या योजनेची घोषणा करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
बँकांनी दुर्लक्ष करू नये
अनेकदा पीक कर्ज वितरित करीत असताना शेतकऱ्यांना कटू अनुभवाचा सामना बँकेत करावा लागतो. पीक कर्ज वितरण करणारा कर्मचारी कोरोनाबाधित असल्यास संबंधित बँकेने पर्यायी व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास देऊ नये. शिवाय कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संबंधित अधिकाऱ्याकडे ती करावी, असे आवाहनसुद्धा केले जात आहे. कोरोनाच्या अत्यंत विदारक परिस्थितीत बँकांनी पीक कर्ज वितरणाकडे दुर्लक्ष करू नये, अशाही भावना व्यक्त होत आहेत.