सुमेध वाघमारे
नागपूर : लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी नसबंदी हे प्रभावी माध्यम आहे. परंतु कोरोना महामारीचा फटका या योजनेलाही बसल्याचे पुढे आले आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात २०१९ मध्ये ४२ हजार ५२२ नसबंदीच्या शस्त्रक्रिया झाल्या तर २०२० मध्ये यात ६१.४१ टक्क्याने घट होऊन १६ हजार ४०८ शस्त्रक्रिया होऊ शकल्या. विशेष म्हणजे, नसबंदीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना व महिलांच्या तुलनेत पुरुषांची नसबंदीची प्रक्रिया सोपी असताना पुरुषांचा सहभाग अत्यल्पच असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होते.
देशात १९५२ पासून कुटुंब नियोजनाची संकल्पना राबविणे सुरू झाले. त्यानंतर सरकारी पातळीवर लोकांमध्ये प्रसार करण्यासाठी विविध योजना राबवल्या. 'हम दो हमारे दो' ही घोषणा लोकप्रिय ठरली. त्यानंतर 'छोटे कुटुंब सुखी कुटुंब' ही घोषणाही त्यात भर टाकणारी ठरली. लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी दोन अपत्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात जवळपास ९० टक्केही उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. यातच कोरोनामुळे याचा फटका या योजनेलाही बसल्याने लोकसंख्येत वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
-नागपूर जिल्ह्यात ३५ टक्क्याने नसबंदीत घट
नागपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये १० हजार ४१ नसबंदीचा शस्त्रक्रिया झाल्या असताना २०२० मध्ये ३ हजार ५३० शस्त्रक्रिया झाल्या. तब्बल ३५ टक्क्याने यात घट आली. पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यातही हेच प्रमाण आहे. भंडारा जिल्ह्यात २०१९ मध्ये ४ हजार ६८४ तर २०२० मध्ये १ हजार ७४०, गडचिरोली जिल्ह्यात २०१९ मध्ये ३ हजार ५७९ तर २०२० मध्ये २ हजार ४९१, गोंदिया जिल्ह्यात २०१९ मध्ये ७ हजार ५१३ तर २०२०मध्ये २ हजार ५६२, चंद्रपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये १० हजार ५६६ तर २०२० मध्ये ३ हजार १७३ तर वर्धा जिल्ह्यात २०१९ मध्ये ६ हजार १३९ तर तर २०२० मध्ये २ हजार ९१२ नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्या.
-नसबंदीचा भार महिलांवरच
स्त्री नसबंदी शस्त्रक्रियापेक्षा पुरुष नसबंदी फारच सोपी आणि सुरक्षित आहे. मात्र तरीदेखील गैरसमजामुळे पुरुष नसबंदीचे प्रमाण अत्यल्प आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ४२ हजार ५२२ नसबंदीच्या शस्त्रक्रिया झाल्या. यात ३७ हजार ६९९ महिलांनी तर ४ हजार ८२३ पुरुषांनी नसबंदी केली. मागील वर्षी, कोरोनाचा काळात १६ हजार ४०८ शस्त्रक्रिया झाल्या. यातही पुरुषांचे प्रमाण फारच कमी होते. १४ हजार ८५९ महिला तर केवळ १ हजार ५४९ पुरुषांचा समावेश आहे.
-पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढण्यावर भर
नसबंदीबाबत बरीच जनजागृती झाल्यानंतर नसबंदीचे प्रमाण वाढले़ मात्र यात महिलांचाच समावेश जास्त आहे़ महिलांच्या तुलनेत पुरुषांची शस्त्रक्रिया साधी व सोप्या पध्दतीने असते़ महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढावे, यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे़
-डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य विभाग नागपूर
-नसबंदी शस्त्रक्रियेचे वास्तव
जिल्हा २०१९ २०२०
नागपूर १००४१ ३५३०
भंडारा ४६८४ १७४०
गडचिरोली ३५७९ २४९१
गोंदिया ७५१३ २५६२
चंद्रपूर १०५६६ ३१७३
वर्धा ६१३९ २९१२
-महिलांच्या तुलनेत पुरुष नसबंदीचे प्रमाण कमी
२०१९
पुरुष नसबंदी-४८२३
महिला नसबंदी-३७६९९
२०२०
पुरुष नसबंदी-१५४९
महिला नसबंदी-१४८५९