रुग्णवाढीमुळे शौचालय सर्वेक्षण शिल्लक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च महिन्यापासून राज्यात वाढू लागलेल्या कोरोना संक्रमणामुळे यंदाचे स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणदेखील लांबणीवर पडले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे २८ मार्चपर्यंत येणारे केंद्रीय नागरी मंत्रालयाचे सर्वेक्षण पथक अद्याप आलेले नाही. १ ते २८ मार्चदरम्यान मुदत होती. केंद्रीय पथकाने नागपुरातील कचरा व स्वच्छतेचे सर्वेक्षण केलेले आहे. मात्र, उघड्यावर शौचाला जाण्याचे सर्वेक्षण शिल्लक राहिले आहे.
स्वच्छ भारत अभियानासाठी सुमारे सहा हजार गुणांकनाचे अनेक निकष पार करावे लागत असल्याने महापालिकेने यंदाची जोरदार तयारी केली होती. अनेक पातळ्यांवर शहराने इतर शहरांच्या तुलनेत प्रगती केली आहे. गेल्या वर्षी नागपूर देशात १८ व्या क्रमांकावर होते, तर २०१९ मध्ये ५८ व्या क्रमांकावर होते. यावर्षी देशभरातील पहिल्या दहा शहरांत क्रमांक यावा, अशा दृष्टीने मनपाच्या आरोग्य विभागाने (स्वच्छता) तयारी केली होती.
गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत पहिली सहा महिने निर्बंधांमुळे शांततेत गेले. सप्टेंबरनंतर देशातील टाळेबंदी उठविण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ची तयारी डिसेंबरपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी मनपाने अनेक उपाययोजना केल्या. त्यासाठी तयारी सुरू असताना फेब्रुवारीपासून कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहिले. तोपर्यंत स्वच्छ भारत सर्वेक्षणच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या. यात शहरातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याच्या नियोजनाची पाहणी करण्यात आली. मात्र, शेवटची उघड्यावर शौचाला किती आळा बसला यावर आधारित होती. शौचालयात होणाऱ्या पाण्याचा वापरदेखील हे पथक पाहणी करणार होते. मात्र, मार्च महिन्यात राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्रीय पथकाने मुदत देऊनही या सर्वेक्षणासाठी येण्याचे टाळले आहे. आता हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
...
गांधी जयंतीपासून केली होती तयारी
ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीपासून स्वच्छ भारत अभियानासाठी मनपाने तयारीला सुरुवात केली होती. डिसेंबरनंतर या तयारीला वेग देण्यात आला होता. त्यामुळे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता यामध्ये मनपाने पूर्ण लक्ष दिले होते; परंतु कोरोना संक्रमण वाढल्याने केंद्रीय पथक अंतिम फेरीच्या तपासणीसाठी आलेले नाही.
डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मनपा