कर्मचारी व अधिकाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या सिव्हिलाइन मुख्यालयातील विविध विभागात ४० ते ४५ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे मनपावरच शहरातील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी आहे. आरोग्य, स्वच्छता, सामान्य प्रशासन, लेखा व वित्त विभाग, नगररचना व सामान्य प्रशासन अशा विभागातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या मनपा मुख्यालयातील नगररचना, आरोग्य, लेखा व वित्त विभागाशी शहरातील नागरिकांशी थेट संबंध येतो. यापूर्वीही आरोग्य, अग्निशमन व अन्य विभागात कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. विशेष म्हणजे, ज्या विभागातील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी केलेली नाही. पॉझिटिव्ह येण्यापूर्वी सर्व जण विभागात कार्यरत होते. सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली तर कोणतीही लक्षणे नसणारे सुपर स्प्रेडर्स मोठ्या प्रमाणात आढळून येतील.
फेब्रुवारीपासून शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण वाढले आहे. मार्च महिन्यात तर उच्चांक गाठला आहे. रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण दिवसाला सरासरी तीन हजारांवर गेले आहे. सध्या कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लक्षणे नसलेले सुपर स्प्रेडर्स हेच कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.
...
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले आहे. नागरिकांशी सर्वाधिक संपर्कात येणारे किराणा दुकानदार, फळ, भाजीविक्रेते, सलूनचालक तसेच औषधविक्रेते कोरोनाचे सुपर स्प्रेडर्स ठरण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे या व्यावसायिक, विक्रेत्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
...
कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी व्हावी
नागरिकांशी कायमचा संबंध येत असलेले महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. चाचणी झाल्यास लक्षणे नसलेले कोरोनाबाधित मोठ्या प्रमाणात आढळून येण्याची शक्यता आहे. यामुळे संक्रमण टाळण्यास मदत होईल.