लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूची भीती, लोकांचा या आजारातील बाधित व संशयित रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, रुग्णांमध्ये निर्माण होणारे गैरसमज, यातून वाढणारा ताण, नैराश्य यामुळे मानसिक आरोग्य ढासळू नये यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष लक्ष दिले जात आहे. लोणारा, आमदार निवास, रविभवन, सिम्बॉयसिस, वनामती येथील संशयितांचे समुपदेशन करून मानसिक आरोग्य जपले जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न केले जात आहे. प्रतिबंधात्मक उपायपासून ते या आजारातून रुग्ण बरे होतात याची माहिती दिली जात आहे. परंतु रुग्णांची वाढती संख्या, सोशल मीडियावर भयभीत करणारे व्हिडीओ, चुकीची माहिती आदींमुळे कोरोनाबाधित संशयित व बाधित रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहिसा बदललेला आहे. यातच अकोल्यातील सर्वाेपचार रुग्णालयात गेल्या आठवड्यात एका रुग्णाने आत्महत्या केल्याचा प्रकारही सामोर आला आहे. हा धोका लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच नागपुरातील संस्थात्मक अलगीकरण कक्षात समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. यात प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर सायकॅट्रिक सोसायटी व काही सामाजिक संस्था मदत करीत आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाचे मनोचिकित्सक डॉ. प्रवीण नवखरे यांनी सांगितले, संस्थात्मक अलगीकरण कक्षातील संशयित लोकांचे समुपदेशन करताना या आजाराची, उपचाराची माहिती दिली जाते. या आजारातून तुम्हीसुद्धा बरे होऊ शकता, असा आत्मविश्वास त्यांच्यात जागविला जातो. त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. दिवसभरात काय करायला हवे, काय नको याचीही माहिती दिली जाते. याचा फायदा होताना दिसून येत असल्याचे डॉ. नवखरे यांंनी सांगितले. अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्नहोम क्वारंटाइन असताना येणाऱ्या मानसिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागपूर सायकॅट्रिक सोसायटीच्या डॉक्टरांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा लाभ नागरिक घेत आहेत. तीन अलगीकरण कक्षात मनोचिकित्सकाडूनही समुपदेशन केले जात आहे. अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
-रवींद्र ठाकरे जिल्हधिकारी