- वर्तमानाचा विचार करून उद्योग करा : ऑटोमोबाईल क्षेत्रात घसरण; डिजिटल पेमेंट वाढले, मिहानमधून निर्यात वाढली
नागपूर : कोरोना महामारीमुळे जगात सर्वच क्षेत्रात उलथापालथ झाली. औद्योगिक विश्वाची अक्षरश: नांगरणी झाली. ज्यांचे कर्ज कमी होते, रोख होती, कामगार होते तो टिकला. अर्थात कोरोना काळात लघु व मध्यम उद्योग टिकले. पण ज्यांचे मोठे उद्योग होते, कर्ज जास्त होते, तो बुडाला. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात ५० पेक्षा जास्त अर्थात २०० कोटींपेक्षा जास्त उलाढालीचे उद्योग आहेत. बँकांच्या मदतीने ते तग धरून आहेत. कोरोनाच्या या काळात उद्योग-व्यावसायिकांना अनेक धडे दिले आहेत आणि शिकविलेही. पडेल ते काम करण्याची सवय झाली आणि कमीत कमी संसाधने वापरून जीवन जगणे आणि व्यवसाय करण्याची शिकवण दिली. यानुसार जो कुणी व्यवसाय करेल तो भविष्यात टिकून राहणार आहे. कोरोना महामारीचा परिणाम हा कधीही न संपणारा आहे.
नवीन उद्योग नाहीत, मोरॅटोरियम व वाढीव कर्ज मिळाले
यावर्षी औद्योगिक क्षेत्रात कुठलेही नवीन उद्योग आले नाहीत. विस्तारीकरणात बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसीमध्ये ३५ ते ५० प्लॉटचे वाटप झाले. उद्योगांना मोरॅटोरियम आणि वाढीव कर्ज मिळाले. प्रॉव्हिडंट फंडात सवलत मिळाली. ईएसआयसीमध्ये सरकारने योगदान दिले. कामगारांचा भाग सरकारने भरला व कारखानदारांना मुदतवाढ मिळाली. ८० टक्के उद्योगांना २९ फेब्रुवारीपर्यंत असलेल्या खेळत्या भांडवलाच्या प्रमाणात वाढीव कर्ज मिळाले. याशिवाय उद्योगांना कायदेशीर पूर्तता करण्यास मुदतवाढ मिळाली.
८० टक्के उद्योग सुरू; मागणीअभावी उत्पादन कमी
कोरोना महामारीने २५ मार्चपासून संपूर्ण भारतातील उद्योगधंद्याची चाके थांबली. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर १ जुलैपासून उद्योग-व्यवसाय पुन्हा सुरू झाले. रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनुसार उद्योगांना २९ फेब्रुवारीपर्यंत असलेल्या खेळत्या भांडवलानुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी १० ते २० टक्क्यांपर्यंत कमी व्याजदरात कर्ज दिले. पण त्यातील बहुतांश रक्कम कामगारांना पगार आणि प्रशासकीय कामावर खर्च झाली. उरलेल्या काही रकमेत अस्तित्वातील ८० टक्के उद्योग नियमित सुरू झाले. पण कोरोनामुळे उद्योगाची साखळी तुटल्याने मागणी कमी, पण उत्पादन जास्त, अशी स्थिती निर्माण झाली. एक महिन्यापूर्वी पुन्हा उद्योगांना हवे असलेल्या कच्च्या मालाचे दर अर्थात स्टील, प्लॅस्टिक, रसायने, निकेल यांचे दर पुन्हा वाढल्याने उद्योग संकटात आले. घेतलेल्या ऑर्डरची पूर्तता करणे कठीण झाले. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे जागतिक बाजारात उद्योगांना टिकून राहणे कठीण झाले. वाढत्या किमतीत नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने नियंत्रण प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी आता उद्योग संघटनांकडून होऊ लागली आहे.
नागपूर जिल्ह्यात ३३०० पैकी १७०० युनिट सुरू, कामगार परतले
नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात आणि क्षेत्राबाहेर एकूण ३३०० लघु, मध्यम व मोठे कारखाने आहेत. कोरोना काळानंतर बुटीबोरीत ६०० युनिट, हिंगणा एमआयडीसीमध्ये ७००, कळमेश्वर येथे ९० आणि औद्योगिक क्षेत्राबाहेर जवळपास ३५० पेक्षा जास्त युनिट सुरू आहेत. सर्वच युनिट बँकांच्या कर्जावर टिकून आहेत. या सर्व युनिटमध्ये सध्या ६५ हजारांपेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत. कोरोना काळात कामगारांचे हित जपणाऱ्या उद्योजकांना पुन्हा उद्योग सुरू करणे कठीण गेले नाही. औद्योगिक क्षेत्रात काहीच कारखानदारांनी कामगारांना पूर्ण पगार देऊन त्यांची काळजी घेतल्याची माहिती आहे. कोरोना काळात स्थानिक लोकांनाही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या.
मिहान-सेझमध्ये निर्यातीत ७२ टक्के वाढ
कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्रात मंदीचे वातावरण असतानाही मिहान-सेझमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत १,५५१ कोटींची उलाढाल करीत ७२ टक्के निर्यात वाढीची नोंद केल्याचे मिहान-सेझचे विकास आयुक्त संभाजीराव चव्हाण यांचे मत आहे. निर्यातीमध्ये आयटी अॅण्ड आयटीईएस क्षेत्र, एव्हिएशन अॅण्ड एअरोस्पेस आणि अॅग्रो प्रोसेसिंग युनिट्सचा सिंहाचा वाटा आहे. कोरोना काळात निर्यातीसोबतच मिहान-सेझमध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी चालना मिळाली. मुंबईच्या एका रत्न व दागिन्यांच्या कंपनीने नागपूर मिहानमध्ये दुकान सुरू केले.
कोरोनाने उद्योजक व व्यावसायिकांना दिले धडे :
- पडेल ते काम करण्याची सवय.
- कमीत कमी संशाधने वापरून जीवन जगणे व व्यवसाय करणे.
- कच्च्या मालाची योग्य प्रमाणात साठवणूक करणे.
- कमीत कमी कर्जाचा बोजा घेऊन व्यवसाय करणे.
- रोकड शिल्लक असल्याचे महत्त्व.
- मनुष्यजीव सर्वात महत्त्वाचा, भेदभाव करीत नाही.
- भविष्याचा विचार करतानाच वर्तमान काळाचा विचार करणे.
- कामगारांचे सहकार्य मिळविण्यासाठी कारखानदारांनी नैतिकता जपणे.