मौदा: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचे प्रमाण नगण्य आहे. मात्र, मुले शाळेत पाठविताना पालकांमध्ये आजही कोरोनाची भीती आहे.
कोरोनासंदर्भात ग्रामीण भागात अधिक जागरूकता निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी अरोली (ता.मौदा) येथील समर्थ रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान वर्ग ८ ते १२च्या ४५२ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अरोली केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सारिका राऊत व त्यांचे सहकारी एस.व्ही. हिवरकर, एम.जी. राऊत यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक सुरक्षित राहावा, तसेच त्यांच्यात या आजाराविषयी अधिक जागरूकता राहावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य एन.एस. कुंभलकर यांनी दिली. या उपक्रमासाठी पर्यवेक्षक रेखा ठोसर, शालेय आरोग्य समितीचे जी.जी. भलावीर, एस.एस. समरीत, एम.ए.पानतावणे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.