नागपूर : कोरोनाची चाचणी केलेल्या शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण चाचणीसाठी नमुने देऊनही त्यांना अहवाल मिळालेला नाही. गेले दोन दिवस शिक्षक सतत अहवालासाठी संबंधित विभागाच्या फेऱ्या मारत आहेत. त्यांना काही दिवस थांबायला सांगितले आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आरटी-पीसीआर चाचणी केलेल्या शिक्षकांना २७ व २८ नोव्हेंबरला अहवाल देणार, असे सांगितले आहे. प्रशासनाच्या या वृत्तीबद्दल शिक्षक व संस्था चालक संतप्त झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, चाचणी केलेले बरेच शिक्षक अहवालावरून तणावात आहेत. पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. तर काही शिक्षक रिपोर्ट न मिळाला तरी नेहमीसारखे कामकाज करीत आहेत. त्यांनी म्हटले की, रिपोर्ट मिळाण्यास उशीर झाल्यास कोरोना संक्रमण वाढेल.
प्रशासनाने शाळेतील शिक्षकांची टेस्ट रिपोर्ट दुसऱ्याच दिवशी देणे गरजेचे आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, टेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रिपोर्ट देण्यास उशीर होत आहे. प्रयत्न सुरू आहे की, शिक्षकांबरोबर सामान्य नागरिकांचा अहवाल एक वा दोन दिवसात देण्यात यावा.