सुमेध वाघमारे
नागपूर : राज्यात पुन्हा एकदा कोरोना उंबरठ्यावर आला आहे. पूर्व विदर्भाचा विचार केला तर मागील पाच दिवसांत ४९ नवे रुग्ण आढळून आले. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ३.१४ टक्केच आहे. धक्कादायक म्हणजे, २१ टक्के लोक अद्यापही दुसरा डोस पासून दूर आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपर्यंत लसीकरणाचा वेग वाढलेला होता. परंतु लाट ओसरताच फेब्रुवारीपासून लसीकरणाचा जोरही मंदावला. आता रुग्ण वाढत असल्याचे दिसून येताच पुन्हा एकदा सरकार व स्थानिक प्रशासन लसीकरणावर भर देत आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत ६ जूनपर्यंत ९५,५३,४६१ लोकांनी पहिला, तर ७९ टक्के म्हणजे, ७५,३८,२३८ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
-नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या डोसचे प्रमाण सर्वांत कमी
सहा जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे, ७५.७७ टक्के आहे. तर, पहिल्या क्रमांकावर भंडारा जिल्हा आहे. येथे ८८.०९ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्हा असून, येथे ८२.८४ टक्के, तिसऱ्या क्रमांकावर गोंदिया जिल्हा असून, येथे ८०.२३ टक्के, चौथ्या क्रमांकावर गडचिरोली जिल्हा असून येथे ७६.६२ टक्के, तर पाचव्या क्रमांकावर वर्धा जिल्हा असून येथे ७५.९५ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
-बूस्टर घेण्यात गडचिरोली मागे
ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स व ६० वर्षांवरील नागरिकांना १० जानेवारीपासून मोफत, तर १० एप्रिलपासून १८ ते ५९ वर्षांपर्यंतच्या लोकांना विकत बूस्टर डोस दिला जात आहे. परंतु दुसऱ्या डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पूर्व विदर्भात ७५,३८,२३८ लोकांनी दुसरा डोस घेतला असताना २,३७,०४९ लोकांनीच बूस्टर घेतला आहे. यात गडचिरोली जिल्हात सर्वांत कमी, १.३३ टक्के लोकांनी हा डोस घेतला आहे. याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यात १.९४ टक्के, गोंदिया जिल्ह्यात २.२६ टक्के, वर्धा जिल्ह्यात २.४८ टक्के, भंडारा जिल्ह्यात २.७४ टक्के तर, नागपूर जिल्ह्यात ४.६२ टक्के लोकांनी डोस घेतला आहे.