नागपूर : ‘कोरोना’ काळात उपचारपद्धतींबाबत विविध अफवा पसरल्या होत्या. आता यावरील लसीकरण सुरू होण्याची तयारी सुरू असताना ‘सोशल मीडिया’वर यासंदर्भात विविध प्रकारच्या ‘फेक न्यूज’ पसरविण्यात येत आहेत. यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून ही बाब प्रशासनाने गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचे मत सायबरतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
‘कोरोना’बाबत अफवा पसरविल्या तर गुन्हे दाखल करू असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला होता. प्रत्यक्षात दाखल गुन्ह्यांचे प्रमाण अत्यल्प होते. भारतासह जगभरात विविध लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. लसीकरणाचा कार्यक्रमदेखील तयार होत आहे. या स्थितीत देशातील मोठ्या शहरांमध्ये अगोदर लसींसंदर्भात विविध अफवा पसरविण्यास सुरुवात झाली. त्याला धार्मिक, सामाजिक रंग देण्याचादेखील या माध्यमातून प्रयत्न होत आहे. पुणे, नाशिकनंतर नागपुरातदेखील ‘सोशल मीडिया’वर अफवा पसरत आहेत.
लसीबाबत अफवा पसरविण्याची मोहीमच सुरू आहे. लसीकरण थेट आरोग्याशी निगडित विषय असल्यामुळे गोंधळ उडणार नाही, याबाबत नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन ‘सोशल मीडिया’ तज्ज्ञ अजित पारसे यांनी केले आहे.