लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या निर्देशानुसार नागपुरात कोविड लसीकरणाचा कार्यक्रम तीन टप्प्यात राबविला जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणुकीत अमलात येणाऱ्या प्रक्रियेप्रमाणे कोरोना लसीकरण कार्यक्रम राबविला जाईल. यासाठी अर्बन टास्क फोर्स गठित करण्यावर मंथन सुरू आहे. बैठका घेतल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील वर्कर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर व तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना ही लस दिली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, चालक, रुग्णालयातील कर्मचारी आदींचा समावेश असेल.
रुग्णालयांना यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. परंतु अपेक्षित प्रतिसाद नाही. ३० टक्के नोंदणी झाली आहे. यात मागे राहिल्यास त्यांना लसीकरणाचा लाभ मिळणार नाही.
दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणजे मनपा कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सैन्यातील जवान, होमगार्ड आदींचा समावेश राहील. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना प्रथम लस दिली जाईल. निवडणुकीत राबविण्यात येणाऱ्या यंत्रणेच्या धर्तीवर लसीकरणासाठी प्रक्रिया राबिवली जाईल. गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. याचे नियोजन सुरू असल्याची माहिती राधाकृष्णन बी. यांनी दिली.
..........
लस साठविण्यासाठी मदत घेणार
आयसीएमआर यांच्याकडून कोरोना लसीकरणाला हिरवी झेंडी मिळताच ही मोहीम हाती घेतली जाईल. लस सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करावी लागेल. यासाठी आवश्यक उपकरणांची मदत घेतली जाणार आहे.