सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कोरोनाबाधितांचा आकडा ६ लाखावर गेला आहे. गेल्या पाच दिवसात देशात सुमारे १ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत तर आतापर्यंत या आजाराने १७ हजार ८३४ रुग्णांचे बळी गेले आहेत. कोरोनावर प्रभावी ठरेल असे औषध वा प्रतिबंधात्मक लस अद्याप तयार नाही. परंतु नुकतेच भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) ने ‘कोवाक्सिन’ नावाच्या लसीला मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. यासाठी देशात १२ सेंटरची निवड केली आहे. यात नागपूरचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यात ४० ते ५० व्यक्तींवर तर दुसऱ्या टप्प्यात १०० व्यक्तींवर ही चाचणी केली जाणार आहे.‘कोवाक्सिन’ नावाची लस भारत बायोटेकने ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गिल्लूरकर म्हणाले, ‘कोवाक्सिन’ नावाच्या या प्रतिबंधात्मक लसीवर न्यूझीलँड व इतर देशात मानवी चाचणी झाली आहे. यांचे चांगले निष्कर्ष आल्याने आता भारतात मानवी चाचणी केली जात आहे.१८ ते ५५ वयोगटातील निरोगी व्यक्तीवर चाचणीडॉ. गिल्लूरकर म्हणाले, १८ ते ५५ वयोगटातील निरोगी व्यक्तींची या चाचणीसाठी निवड केली जाईल. यातही ज्या व्यक्तींना यकृत, मूत्रपिंड, हृदयाचा कुठलाही आजार नाही, मधुमेह, एचआयव्हीचा संसर्ग नाही, कॅन्सर नाही आणि जे स्वत:हून या संशोधनात सहभागी होण्यास इच्छुक आहे त्यांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यात साधारण ४० ते ५० मानवावर चाचणी केली जाईल.सोमवारपासून मानवी चाचणीला सुरुवातपहिल्या टप्प्यात देशातील १२ सेंटरवर साधारण ३७५ मानवावर ही चाचणी होईल. पहिला व दुसरा टप्पा मिळून सुमारे ११२५ मानवावर हे संशोधन होणार आहे. ‘प्री क्लिनीकल ट्रायल’मध्ये ही लस धोकादायक नसल्याचे समोर आले आहे. शनिवारी ही लस उपलब्ध होणार आहे. सोमवारपासून नागपुरात याच्या चाचणीला सुरुवात होईल.-डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकरसंचालक, गिल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल