लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना विषाणूचे थैमान जगभरात धुडगूस घालत आहे. संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा हा विषाणू चीनमधूनच सर्वत्र पसरला. यामुळे चिनी व्यक्तींबाबत सामान्यांमध्ये भीती आहे. नागपुरात असाच एक चिनी व्यक्ती आढळून येताच मंगळवारी गोंधळ उडाला. लोकांनी त्यांना पोलिसांच्या हवाली केले. साक्षात चिनी व्यक्ती समोर पाहून पोलिसही हादरले होते. त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून मेयोमध्ये दाखल केले. बुधवारी सकाळी त्यांचे नमुने निगेटिव्ह येताच, सामान्यांपासून ते पोलीस प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला. हुन हुवांग (४०) हे त्या चिनी व्यक्तीचे नाव. मिळालेल्या माहितीनुसार, हुन हुवांग यांचा मसाल्यांचा व्यवसाय आहे. त्या निमित्ताने ते ऑक्टोबर २०१९मध्ये बांगलादेशात गेले. तेथून डिसेंबर २०१९ मध्ये भारतात आले. १३ फेब्रुवारी २०२० रोजी ते नागपूरमधून उमरेडला गेले. येथे एका हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान, कोरोना विषाणूची दहशत पसरताच या चिनी व्यक्तीबाबत अनेक जण शंका घेऊ लागले. हॉटेलमालकावर मंगळवारी दबाव वाढताच हुवांग यांना बाहेर काढले. लोक चिडून होते. परंतु त्याचवेळी कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. समोर चिनी व्यक्ती दिसताच तेही हादरले. काहींनी तोंडाला रुमाल तर काहींनी दुप्पटा बांधला. त्याला व्हॅनमध्ये बसविले. त्यांच्या बाजूला कोणीच बसले नाही. कसेतरी नागपूर गाठले. मेयोतील ‘कोविड-१९’च्या ओपीडीत आणले. समोर चिनी व्यक्ती पाहताच डॉक्टर व कर्मचारी हबकले. त्यांनी त्यांच्याशी संवाद सादला. कोरोना पसरण्यापूर्वीच ते भारतात आल्याचे लक्षात येताच त्यांना धीर आला. परंतु चीनची पार्श्वभूमी असल्याने नियमानुसार त्यांचे नमुने घेऊन वॉर्ड क्र.२५मध्ये दाखल केले. बुधवारी सकाळी नमुने निगेटिव्ह येताच सर्वांनाच दिलासा मिळाला. हुवांग यांना दुपारी पोलिसांच्या मदतीने आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले. सध्या भारतात ‘लॉकडाऊन’ आहे. ते संपल्यावर त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविले जाणार आहे. गैरसमज पसरवू नकाचिनी व्यक्ती असो की भारतीय, कुणा व्यक्तीविषयी गैरसमज पसरवू नका. पोलिसांची मदत घ्या. त्यांंना माहिती आहे काय करायचे आहे. चीनचे नागरिकत्व असलेल्या हुन हुवांग यांना कुठलीही लक्षणे नव्हती. शिवाय, कोरोना विषाणूची पार्श्वभूमी नव्हती. तरीही त्यांचे नमुने तपासण्यात आले. नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले.डॉ. सागर पांडेउपवैद्यकीय अधीक्षक, मेयो
Corona virus : चिनी व्यक्ती नागपुरात : लोकांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 7:44 PM
कोरोना विषाणूचे थैमान जगभरात धुडगूस घालत आहे. संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा हा विषाणू चीनमधूनच सर्वत्र पसरला. यामुळे चिनी व्यक्तींबाबत सामान्यांमध्ये भीती आहे. नागपुरात असाच एक चिनी व्यक्ती आढळून येताच मंगळवारी गोंधळ उडाला.
ठळक मुद्दे नमुने निगेटिव्ह येताच सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास