लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे. त्यास नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. त्यासोबतच देवस्थान ट्रस्ट आणि सामाजिक संस्थांनीही प्रशासनाच्या हाकेला ‘ओ’ दिला आहे. नागपूर शहरातील प्रसिद्ध श्री टेकडी गणेश मंदिर, दीक्षाभूमी बंद ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.त्यासोबतच इतरही मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी टाळली जावी, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोमवारपासून नागपूर शहरात साथरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनींना परवानगी नाकारली आहे. तरीही असे कार्यक्रम आयोजित केल्यास कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. सरकार वारंवार गर्दी टाळण्याचे आवाहन करीत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवस मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दीक्षाभूमीही बंद ठेवण्यात येणार आहे.ड्रॅगन पॅलेस बंदकोरोना विषाणू संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जगविख्यात ड्रॅगन पॅलेससुद्धा आज बुधवारपासून बौद्ध अनुयायी व पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे, तेव्हा नागरिकांनी याची दखल घेत सहकार्य करावे, असे आवाहन ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी केले आहे.टेकडी गणेश मंदिरासमोर शुकशुकाटकोरोनापासून खबरदारी घेण्यासाठी बुधवारी दुपारपासून टेकडी गणेश मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास टेकडी गणेश मंदिरासमोर शुकशुकाट होता. मंदिराच्या समोरील गेटच्या बाजूला बसणारे फूल, नारळ, फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली होती. मंदिराच्या समोरील रस्त्यावर नेहमीच गर्दी असल्यामुळे तेथे वाहतूक विस्कळीत होते. परंतु दुपारपासून मंदिर भाविकांसाठी बंद केल्याची वार्ता शहरात पसरल्यामुळे भाविक दर्शनासाठी आले नाहीत. मंदिरासमोरील रस्त्याच्या एका बाजूला दुचाकीची पार्किंग असते. मात्र मंदिरच बंद करण्यात आल्यामुळे मंदिरासमोरील भागात एकही वाहन उभे नव्हते. ज्यांना माहीत नाही ते भाविक दर्शनासाठी येत होते. परंतु मंदिर बंद असल्याचे गेटवरच समजल्यामुळे ते आल्यापावली परतले.
साईमंदिर, वर्धा रोडश्री साईबाबा सेवा मंडळाने कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सूचनाफलक लावले आहे. महाराष्ट्र शासनाने साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या कलम १४४ चा हवाला देत भाविकांना आवाहन केले आहे की, एकाच ठिकाणी ५ लोक जमा होऊ नये. मंदिरात दर्शनासाठी येताना हार, फूल, नारळ आणू नयेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकांकडून भाविकांना हात स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जात आहे. मंदिर प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत दर गुरुवारी होणारा महाप्रसाद बंद केला आहे, तसेच भाविकांनाही महाप्रसाद वितरण करण्यास आणू नये, असे आवाहन केले आहे. मंदिरांमध्ये कोरानाग्रस्तांच्या आरोग्यासाठी प्रार्थना घेण्यात आली. मंदिरात चारवेळा होणाºया आरतीमध्ये पुजारी भाविकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवाहन करीत आहेत. कोरोनाची भीती सर्वत्र आहे. पोलीस प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहे. प्रशासनसुद्धा वारंवार सतर्कता बाळगण्याचे आवाहन करीत आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आराधना परिवाराने भाविकांच्या आरोग्यासाठी प्रगट दिन उत्सव रद्द केला आहे. काही दिवसच ही सतर्कता बाळगायची आहे. त्यामुळे मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी करू नये. दिनकर कडू, अध्यक्ष, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आराधना परिवार.