लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या ४०० वर गेली. आज पुन्हा ४३० नव्या रुग्णांची भर पडली तर ९ रुग्णांचा जीव गेला. कोरोनाबाधितांची एकूण संख्या १,१८,७७७ झाली असून मृतांची संख्या ३,८२५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, चाचण्यांची संख्या पाच हजाराखाली असताना रुग्ण वाढले आहेत. नव्या रुग्णांच्या तुलनेत अधिक, ४९३ रुग्ण बरे झाले.
मेयो, मेडिकल व एम्समध्ये कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. यातही जे भरती आहेत त्यात ५० वर्षांपुढील रुग्णांची संख्या मोठी आहे. मागील सहा दिवसांत मृतांची संख्या दहाच्या खाली आहे. परंतु तीन दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. आज ४,६३९ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३,७३९ आरटीपीसीआर तर ९०० रॅपिड अँटिजेन चाचण्या होत्या. अँटिजेनमधून ४३ तर आरटीपीसीआर चाचणीतून ३८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एम्सच्या प्रयोगशाळेतून १७, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ६२, मेयोच्या प्रयोगशाळेतून ८३, माफसूच्या प्रयोगशाळेतून १२, नीरीच्या प्रयोगशाळेतून ३४, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून ३१ तर खासगी प्रयोगशाळेतून १४८ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. आतापर्यंत १,०९,०४८ रुग्ण बरे झाले आहेत. ५,९०४ रुग्ण सक्रिय असून यातील १,३९७ रुग्ण विविध रुग्णालयात तर ४,५०७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
शहरात ९४,०२७ तर ग्रामीणमध्ये २४,००९ बाधित
शहरात आज ३४७, ग्रामीणमध्ये ७९ तर जिल्ह्या बाहेरील ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरात आतापर्यंत एकूण ९४,०२७, ग्रामीणमध्ये २४,००९ तर जिल्ह्याबाहेरील ७४१ बाधितांची नोंद झाली आहे. मृतांमध्ये आज शहरातील ४, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील ४ आहेत. आतापर्यंत शहरात एकूण २,६०३, ग्रामीणमध्ये ६६३ तर जिल्ह्याबाहेरील ५५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दैनिक संशयित : ४,६३९
बाधित रुग्ण : १,१८,७७७
बरे झालेले : १,०९,०४८
उपचार घेत असलेले रुग्ण : ५,९०४
मृत्यू : ३,८२५