लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या काळात १५० ते २५० रुग्णापर्यंत नोंद झालेली दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसात ४५०वर नोंदवली गेली आहे. मात्र ही कोरोनाची दुसरी लाट नसून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये वाढ केल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात ६९३८ चाचण्या झाल्या. यात ४५७ नव्या रुग्णांची भर पडली. ८ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या ११०७८९ तर मृत्यूची संख्या ३६३६वर पोहचली.
नागपूर जिल्ह्यात दिवाळीच्या दिवसात २ ते ४ हजारावर चाचण्या होत होत्या. यामुळे रुग्णांची संख्या कमी होती. आता ७ ते ९ हजारावर चाचण्या गेल्याने जास्त रुग्ण आढळून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. आज ५२९४ संशयित रुग्णांची आरटीपीसीआर तर १६४४ संशयित रुग्णांची रॅपिड अँटीजेन असे मिळून ६९३८ संशयितांची चाचणी करण्यात आली. अँटिजेन चाचणीत ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून १६०६ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील ३७७, ग्रामीणमधील ७९ तर जिल्हाबाहेरील १ रुग्ण आहे. मृतांमध्ये शहरातील ६, ग्रामीणमधील १ तर जिल्हाबाहेरील १ आहे. दिवाळीनंतर नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज २६२ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १०२१५१ वर गेली आहे.
दिवाळीत ३१७९ होते अॅक्टीव्ह रुग्ण
दिवाळीच्या एक दिवसापूर्वी, १४ नोव्हेंबर रोजी अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३१७९ होती. मंगळवारी ती ५००२ वर पोहचली. यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मेडिकलमध्ये २०३, मेयोमध्ये ८३, एम्समध्ये ३४ रुग्ण उपचाराखाली असून खासगी हॉस्पिटलसह कोविड केअर सेंटरमध्ये ११९९ रुग्ण दाखल आहेत. होम आयसोलेशनमध्ये ३४८३ रुग्ण आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६९३८
बाधित रुग्ण : ११०७८९
बरे झालेले : १०२१५१
उपचार घेत असलेले रुग्ण : ५००२
मृत्यू : ३६३६