लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाबाबत नागपूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज पहिल्यांदाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.०४ टक्क्यांवर गेले. तब्बल ८२,४३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या महिन्यात पुन्हा सर्वात कमी, १३ मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील सात, ग्रामीणमधील तीन तर जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश आहे. ४२७ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ९१,५५९ वर पोहचली आहे.
सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढली होती. रुग्णसंख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला होता. मात्र, मागील २० दिवसापासून रुग्णांसोबतच मृत्यूच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. आज ३,८८१ संशयित रुग्णांचे आरटीपीसीआर तर, २,८९४ संशयित रुग्णांचे रॅपिड ॲन्टिजन अशा एकूण ६,७७५ चाचण्या करण्यात आल्या. यात ॲन्टिजन चाचण्यातून १६० तर, आरटीपीसीआर चाचण्यातून २६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३३६, ग्रामीणमधील ८८ तर जिल्हाबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे.
उपचाराखालील रुग्णांची संख्याही कमी
सप्टेंबर महिन्यात ११ हजारावर रुग्ण उपचाराखाली होते. मागील २० दिवसात अशा रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. सध्या शहरात ३,७९६ तर ग्रामीणमध्ये २,३४५ असे एकूण ६,१४१ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ४,१३८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६.३० टक्के
आज ६,७७५ चाचण्या तर ४२७ बाधित रुग्ण आढळले. चाचण्यांच्या तुलनेत नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हीटी रेट) ६.३० टक्क्यांवर आले आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत ३९, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ४९, मेयोच्या प्रयोगशाळेत ३५, माफसूच्या प्रयोगशाळेत शून्य, नीरीच्या प्रयोगशाळेत ३४ तर खासगी लॅबमधून ११० रुग्ण पॉझिटिव्ह आले.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,७७५
बाधित रुग्ण : ९१,५५९
बरे झालेले : ८२,४३९
उपचार घेत असलेले रुग्ण : ६,१४१
मृत्यू : २,९७९.