लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनबाधितांचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. ४७ दिवसानंतर पहिल्यांदाच मृत्यूसंख्या २२ वर आली. विशेष म्हणजे, आज ८७६ नव्या रुग्णांची भर पडली असली तरी याच्या दुप्पट रुग्ण बरे झाले. १,८२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८२.८७ टक्क्यांवर गेले आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ८०,८४४ तर मृतांची संख्या २,५९६ झाली आहे.जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा कहर दिसून आला. परंतु मागील सात दिवसांत रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला. १५ आॅगस्ट रोजी १४ मृत्यूची नोंद होती. त्यानंतर मृत्यूची सर्वाधिक नोंद सप्टेंबर महिन्यात झाली. एकाच दिवशी ६४ रुग्णांचे बळी गेले होते. परंतु दीड महिन्यानंतर आता मृत्यूची संख्या कमी होऊ लागली आहे.चाचण्यांची संख्या रोडावलेलीचकोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी होणे व बाधितांना उपचाराखाली आणणे गरजेचे आहे. मात्र चाचण्यांची संख्या रोडावल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शनिवारी ५,४५२ चाचण्या झाल्या. यात ३,३८८ आरटीपीसीआर तर २,०६४ रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ६६४, ग्रामीणमधील २२१ तर जिल्ह्याबाहेरील एक रुग्ण आहे. मृतांमध्ये शहरातील १७, ग्रामीणमधील चार तर जिल्ह्याबाहेरील एक आहे.कोरोनाचे ४,०४० रुग्ण उपचाराखालीतीन शासकीय रुग्णालयांसह, कोविड केअर सेंटर व खासगी हॉस्पिटलमध्ये सध्याच्या स्थितीत ४,०४० रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ७,२१० रुग्ण गृह विलगीकरण म्हणजे होम आयसोलेशनमध्ये आहेत. एकूण ११,२५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज खासगी लॅबमधून ४०० रुग्ण, अॅन्टिजेन चाचणीतून २२७ तर मेयो, मेडिकल, एम्स, माफसू, नीरी व विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून केवळ २४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ५,४५२बाधित रुग्ण : ८०,८४४बरे झालेले : ६६,९९८उपचार घेत असलेले रुग्ण : ११,२५०मृत्यू : २,५९६
CoronaVirus in Nagpur : नागपुरात ४७ दिवसानंतर मृत्यूची संख्या २२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:29 PM
Corona virus,Death toll decrease, Nagpur News कोरोनबाधितांचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. ४७ दिवसानंतर पहिल्यांदाच मृत्यूसंख्या २२ वर आली. विशेष म्हणजे, आज ८७६ नव्या रुग्णांची भर पडली असली तरी याच्या दुप्पट रुग्ण बरे झाले.
ठळक मुद्दे८७६ रुग्णांची भर : नव्या रुग्णांच्या दुपटीने रुग्ण बरे