लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाच्या संसर्गाचे मुख्य केंद्र असलेल्या नागपूर जिल्ह्यात या विषाणूचा विळखा कमी होत आहे. समाधानकारक बाब म्हणजे, रुग्णवाढीचा दर १०६ दिवसांवर गेला आहे. यातच दिवसाला सध्या सरासरी ६०० ते हजारापर्यंत रुग्ण कोरोनाच्या संसर्गातून बरे होत आहेत. दुसरीकडे रोजच्या मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. शुक्रवारी ६७४ रुग्ण व २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ८९,७६१ तर मृतांची संख्या २,९१२ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात आज चाचण्यांची संख्या वाढली. ४,०९८ आरटीपीसीआर तर ३,१९१ रुग्णांच्या रॅपिड ॲन्टिजेन अशा एकूण ७,२८९ चाचण्या झाल्या. मागील काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या वाढलेली आहे. त्या तुलनेत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये शहरातील ३६७, ग्रामीणमधील २९८ तर नऊ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. मृतांमध्ये नऊ रुग्ण शहरातील, दोन ग्रामीण भागातील तर नऊ जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ११ रुग्णांचेबळी गेले आहेत.
जिल्ह्याबाहेरील ३४३ रुग्णांचे बळी
नागपूर जिल्ह्यातील मृतांची संख्या २,९१२ झाली असली तरी यातील ३४३ मृत जिल्हाबाहेरील होते. नागपुरात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात नोंद झाली. आतापर्यंत शहरातील २०५२ तर ग्रामीण भागातील ५१७ रुग्णांचे बळी गेले आहेत. आज १,००९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९,८५३ झाल्याने कोरोनामुक्तांचा दर ८८.९६वर गेला आहे. सध्या ६,९९६ रुग्ण उपचार घेत आहेत. यात शहरातील ४,३९३ तर ग्रामीणमधील २,०६३ रुग्णांचा समावेश आहे.
खासगी रुग्णालयात ४९१ रुग्णांचा मृत्यू
कोरोना महामारीच्या या आठ महिन्याच्या काळात खासगी रुग्णालयात ४९१ रुग्णांचे मृत्यू झाले. मेडिकलमध्ये ४,५६१ रुग्ण बरे झाले तर १२२३ रुग्णांचे बळी गेले. मेयोमध्ये १६९० रुग्ण बरे तर ११०० रुग्णांचे जीव गेले. एम्समध्ये ५४१ रुग्ण बरे तर १२ रुग्णांचे मृत्यू, लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणामध्ये ७७२ रुग्ण बरे तर ४० मृत्यू, लता मंगेशकर हॉस्पिटल बर्डीमध्ये १२१ रुग्ण बरे तर तीन मृत्यू, शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये १,३६५ रुग्ण बरे झाले असून ४२ रुग्णांचे बळी गेले आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ७,२८९
बाधित रुग्ण : ८९,७६१
बरे झालेले : ७९,८५३
उपचार घेत असलेले रुग्ण : ६,९९६
मृत्यू :२,९१२