लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर – लॉकडाऊन लावला असतानादेखील नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दाहकता वाढते आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरात तीन हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले. गुरुवारी तर बाधितांच्या संख्येने नकोसा विक्रम निर्माण केला असून, २४ तासात ३ हजार ७९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. दुसरीकडे मृत्यू पडलेल्यांची संख्यादेखील वाढत असून, २३ जणांनी प्राण गमाविले. एकूण बाधित रुग्णांपैकी ७६ टक्के रुग्ण हे शहरातील आहेत. लॉकडाऊन लावल्यानंतरदेखील रुग्णसंख्या वाढत असल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
बुधवारी नागपूर शहरातील रुग्णसंख्या प्रथमच तीन हजारावर गेली होती. गुरुवारी त्याहून अधिक रुग्णसंख्या नोंदविल्या गेली. २४ तासातच जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा ४२६ ने वाढला तर, मृत्यूची संख्या सातने वाढली. गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये २ हजार ९१३ रुग्ण म्हणजेच ७६.७४ टक्के रुग्ण शहराच्या हद्दीतील आहेत. २४ तासात शहरातील रुग्णांमध्ये २४५ रुग्णांची वाढ झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १,८१,५५२ तर मृतांची संख्या ४,५२८ वर पोहचली आहे.
ग्रामीणमध्येदेखील वाढतोय धोका
बुधवारी नागपूर ग्रामीणमध्ये ६६९ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते व पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. बुधवारी यात आणखी वाढ झाली. ग्रामीण भागात ८८० बाधित आणि सहा मृत्यूची नोंद झाली. ग्रामीण भागातदेखील धोका वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्हाबाहेरील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले व तिघांचा मृत्यू झाला.
चाचण्यांचा १६ हजारी टप्पा
नागपूर जिल्ह्यात गुरुवारी १६ हजार १३९ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. हा देखील एक रेकॉर्डच ठरला. ग्रामीण भागात ५ हजार ३३९ तर शहरात १० हजार ८०० चाचण्या झाल्या. यातील आरटीपीसीआरचे १२ हजार ५७७ तर रॅपिड ॲन्टिजेन टेस्टच्या ३ हजार ५६२ नमुन्यांचा समावेश होता.
सक्रिय रुग्ण २३ हजाराहून अधिक
सक्रिय रुग्णसंख्येनेदेखील नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार ६१४ इतकी झाली आहे. यातील १९ हजार ६६ रुग्ण नागपूर शहरातील आहेत. विविध सरकारी व खासगी रुग्णालयात ६ हजार ८६७ रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात १ हजार २७७ रुग्ण बरे झाले.
कुटुंबच येत आहेत पॉझिटिव्ह
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे आकडे सातत्याने वाढत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कुटुंबातील दोन किंवा अनेक सदस्य बाधित होत आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र, तेथे योग्य काळजी घेतली जात नसल्याने कुटुंबातील इतर सदस्यदेखील बाधित होत आहेत. प्रशासनाकडून दावा करण्यात येत आहे की, चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्ण जास्त दिसून येत आहेत. मात्र, याअगोदरदेखील १० हजारांपर्यंत चाचण्या गेल्या होत्या, पण तेव्हा बाधितांची संख्या इतकी दिसून आली नव्हती. लवकरच संसर्गाचा वेग कमी होईल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
असे वाढले आठवडाभरात आकडे
तारीख – पॉझिटिव्ह रुग्ण
१२ मार्च – २,०६७
१३ मार्च – २,२७९
१४ मार्च – २,३५३
१५ मार्च – २,४४८
१६ मार्च – २,६२१
१७ मार्च – ३,३७०
१८ मार्च - ३,७९६
एकूण – १८,९३४
कोरोनाची आकडेवारी
दैनिक चाचण्या : १६,१३०
एकूण बाधित रुग्ण :१,८१,५५२
सक्रिय रुग्ण : २३,६१४
बरे झालेले रुग्ण : १,५४,४१०
एकूण मृत्यू : ४,५२८