लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च व एप्रिल महिन्यात थैमान घातलेल्या दुसऱ्या लाटेचा कहर ओसरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १००च्या आत होती. गुरुवारी ९१ रुग्ण व १० मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील ४९ रुग्ण, ५ मृत्यू तर ग्रामीण भागातील ३८ रुग्ण, १ मृत्यूचा समावेश आहे. आज ४०१ रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७.६२ टक्क्यांवर गेले आहे.
कोरोनाचे निर्बंध अंशत: शिथिल होताच सर्वच ठिकाणी गर्दी होत आहे. यातच पावसाळी वातावरण तयार झाल्याने आणि विषाणूसाठी पोषक ठरत असल्याने तिसºया लाटेची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट येऊच नये यासाठी, कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. गुरुवारी चाचण्यांची संख्या वाढून १०,७४९ झाली. यात शहरात ७८८१ चाचण्यांमधून ०.६२ टक्के तर ग्रामीणमध्ये झालेल्या २८६८ चाचण्यांमधून १.३२ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या ४,७६,१७९ तर मृतांची संख्या ८,९८८वर पोहचली आहे.
१४८ रुग्णालयात कोरोनाचे शून्य रुग्ण
नागपूर जिल्ह्यातील २३१ शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरपैकी तब्बल १४८ रुग्णालयात शून्य रुग्णसंख्या आहे. सध्या ५६२ रुग्ण उपचाराखाली असून यातील मेडिकलमध्ये सर्वाधिक ९० रुग्ण आहेत. मेयोमध्ये ४५, तर एम्समध्ये २२ रुग्ण उपचाराखाली आहेत. इतर खासगी रुग्णालयात १०च्या आत रुग्ण आहेत. सध्या १७९४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या: १०७४९
शहर : ४९ रुग्ण व ५ मृत्यू
ग्रामीण : ३८ रुग्ण व १ मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७६,१७९
ए. सक्रिय रुग्ण : २३५६
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६४,८३५
ए. मृत्यू : ८,९८८