लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांसोबतच मृत्यूची संख्या कमी होऊ लागली आहे. गुरुवारी ग्रामीण भागात एकाही मृत्यूची नोंद नव्हती. मात्र शहरात चार व जिल्हाबाहेरील चार असे एकूण आठ रुग्णांचे मृत्यू झाले. जिल्ह्यात ३०१ बाधित रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या १,०४,१७७ तर मृतांची संख्या ३,४४७ झाली. ३३१ बाधितांनी कोरोनावर मात केली. बरे होणाऱ्या रुग्णांचे हे प्रमाण ९३.२४ टक्क्यांवर पोहचले आहे.
शहरात आतापर्यंत २,४३८ तर ग्रामीण भागात ५७७ रुग्णांचे मृत्यू झाले. मागील दोन आठवड्यापासून विशेषत: ग्रामीणमधील मृत्यूची संख्या दहाच्या खाली आली आहे. सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले. या महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात ४९ टक्क्याने मृत्यूची संख्या कमी झाली. आज ३,१५८ आरटीपीसीआर, तर १८९९ रॅपिड ॲन्टिजेन अशा एकूण ५,०५७ चाचण्या झाल्या. ॲन्टिजेन चाचणीत ३८ रुग्ण पॉझिटिव्ह तर १८६१ रुग्ण निगेटिव्ह आले. याशिवाय, एम्सच्या प्रयोगशाळेत ७, मेडिकलच्या प्रयोगशाळेत २४, मेयोच्या प्रयोगशाळेत ५४, माफसूच्या प्रयोगशाळेत ३१, नीरीच्या प्रयोगशाळेत १२, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १३ तर खासगी प्रयोगशाळेत १२२ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. शहरात आमदार निवास, पाचपावली पोलीस क्वॉर्टर व व्हीएनआयटी असे तीन कोविड केअर सेंटर होते. परंतु रुग्णसंख्या कमी होताच आमदार निवासातील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. व्हीएनआयटी सेंटरमध्ये पाचच रुग्ण आहेत. व्हीएनआयटी प्रशासनाने शासनाकडे सेंटर बंद करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. यामुळे हे सेंटर बंद होण्याच्या स्थितीत आहे. सध्या पाचपावली सेंटरमध्ये ३० रुग्ण आहेत.
सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट
जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव सप्टेंबर महिन्यात दिसून आला. या महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ११,८९५ वर गेली होती. मात्र, होम आयसोलेशनची संख्या मोठी असल्याने व तातडीने उपचार मिळाल्याने दोन महिन्यातच ही संख्या ३,५९८ वर आली. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ५,०५७
बाधित रुग्ण : १,०४,१७७
बरे झालेले : ९७,१३२
उपचार घेत असलेले रुग्ण : ३,५९८
मृत्यू : ३,४४७