लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात रविवारी जनता कर्फ्यू घोषित केला गेला आहे. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात जनता कर्फ्यूला नागरिकांनी स्वयंस्फूर्तच प्रतिसाद द्यावा. अत्यावश्यक कामाच्या निमित्तानेच नागरिकांनी बाहेर पडावे. अन्यथा कुटुंबीयांसोबत घरीच राहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे.जनता कर्फ्यू म्हणजे, लोकांनी, लोकांच्या आरोग्यासाठी घेतलेली काळजी होय. लोक एकमेकांच्या संपर्कात आले नाहीत तर कुणाचा कुणाला संसर्ग होणार नाही. अर्थात् महामारी, साथरोग पसरणार नाही. त्यावर अंकुश ठेवता येईल या उद्देशाने रविवारचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. त्याला कुणी बाधा पोहचवीत असेल, कारण नसताना घराबाहेर फिरत असेल तर असा व्यक्ती राष्ट्रीय हिताला बाधा पोहचवीत असल्याचे मानले जाईल. स्वत:सोबतच तो त्याच्या कुटुंबीयांच्या आणि इतरांच्याही आरोग्याला धोका पोहचवत असल्याचे मानले जाऊन, अशा व्यक्तींना पोलीस ताब्यात घेतील. पोलिसांनी रविवारच्या जनता कर्फ्यूच्या बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे.२५० अधिकारी, ४५०० कर्मचारीजनता कर्फ्यू नागरिकांनीच यशस्वी करायचा आहे. पोलीस आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी नेहमीप्रमाणे रस्त्यावर असतील. त्यात २५० अधिकारी आणि ४५०० पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागात तैनात करण्यात आले आहेत. या शिवाय विविध पोलीस ठाण्यातील मंडळी नेहमीप्रमाणे गस्तीवर राहीलच.३० ठिकाणी नाकेबंदीउपराजधानीत ३० ठिकाणी नाकेबंदी लावली जाणार आहे. या ठिकाणी पोलीस रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी करतील. त्यात पायी चालणाऱ्यांपासून, सायकल, दुचाकी, कार तसेच मोठ्या वाहनचालकांचाही समावेश राहील. जनता कर्फ्यूची संधी साधून दारूविक्रेते, अवैध धंदेवाले किंवा काळाबाजारी करणारे आपल्या मालाची इकडून तिकडे वाहतूक करत आहे काय, त्याचीही तपासणी केली जाईल.... तर कारवाई!मनाई असूनही घराबाहेर कशासाठी पडले, त्याची शहानिशा केली जाईल. एखाद्या वाहनात वाहनचालकाव्यतिरिक्त किती जण बसले आहेत, ते कुठून आले, कुठे चालले, त्या सर्वांना घराबाहेर पडण्याची गरज होती का, ते तपासले जाईल. अत्यावश्यक कामाशिवाय कुणी फिरताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पोलीस कारवाईला सामोरे जाऊन विनाकारण पोलीस ठाण्याच्या आवारात वेळ घालविण्याऐवजी घरीच राहणे योग्य ठरणार आहे.अफवांपासून सावधान!कोरोनाच्या संबंधाने काही उपद्रवी आणि काही उत्साही मंडळी सोशल मीडियावर उलटसुलट मेसेज टाकत आहेत. त्यातून झपाट्याने अफवा पसरतात. गैरसमज होतात. नागरिकांनी अशा उपद्रवी मंडळींना दाद देऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शहानिशा केल्याशिवाय कोणतीही भूमिका घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
असा राहील बंदोबस्त
पोलीस उपायुक्त : ८ सहायक आयुक्त : १२पोलीस निरीक्षक : ६५उपनिरीक्षक ते सहायक निरीक्षक : २०३ पुरुष कर्मचारी : २०२३ महिला पोलीस : २९२ होमगार्डस् : ५०० शीघ्र कृती दल सज्ज शहराला जोडणाऱ्या ८ नाक्यांवर ४० अधिकारी आणि १७६ पोलीस कर्मचारी नाकेबंदीसाठी तैनात राहतील .पोलीस नियंत्रण कक्षात गुन्हे शाखेचे २, आर्थिक गुन्हे शाखेचे १ आणि पोलीस मुख्यालयात ७ पथके सज्ज (राखीव) ठेवली जाणार आहेत. प्रत्येक पथकात १० पुरुष आणि ५ महिला पोलीस राहतील. शीघ्र कृती दल आणि दंगा नियंत्रण पथकेही सज्ज राहणार आहेत. या शिवाय पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वेगळे राहणार आहे.