नागपूर : कोरोनाच्या धास्तीमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. प्रवासीच मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्या रद्द करीत आहे. कन्फर्म तिकीट असल्याशिवाय प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात येत नाही. अशा काळातही रेल्वेगाड्यात तृतीयपंथी सक्रिय असून वर्षभरात प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या ३५ तृतीयपंथींकडून ४६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च २०२० मध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या काळात केवळ मालवाहतूक व स्थलांतरित मजुरांच्या सुविधेसाठी मोजक्या श्रमिक एक्स्प्रेस सोडण्यात आल्या. पहिली लाट ओसरल्यानंतर विशेष रेल्वेगाड्याच चालविण्यात आल्या. त्यातही कन्फर्म तिकिटांशिवाय प्रवेश नव्हता. कोरोनाच्या या काळातही तृतीयपंथीयांनी रेल्वेगाड्यात धुमाकूळ घातला. रेल्वेस्थानकावर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असला तरी तृतीयपंथी मुंबई किंवा दिल्ली एण्डकडील आउटरवरून कोचमध्ये चढतात. पुढचे स्टेशन येण्यापूर्वीच उतरून पळ काढतात. प्रवाशांच्या कुटुंबीयांसमोर ते अश्लील चाळे करीत असल्यामुळे बहुतांश प्रवासी पैसे देऊन मोकळे होतात. बरेचदा अरेरावीही केली जाते. प्रवाशांना छळून त्यांच्याकडून बळजबरीने वसुली करणाऱ्या ३५ तृतीयपंथीयांची १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात धरपकड करण्यात आली. रेल्वे अॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ४६ हजाराचा दंड सुनावला.
..........
९ भिकाऱ्यांना ७ हजार ८०० रुपये दंड
रेल्वेस्थानकावर भिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येत नाही. तरीसुद्धा अनेक भिकारी रेल्वेस्थानकाच्या परिसरात फिरताना दिसतात. लॉकडाऊनच्या काळात विशेष रेल्वेगाड्या सुरू असताना पुन्हा भिकारी रेल्वेस्थानकावर येऊ लागले. मागील वर्षभरात ९ भिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
..........