नरखेड, जलालखेडा : कोरोनानाने अख्ख्या जगाला विळखा घातला. अनेकांचे जीव गेले. मात्र राज्यातील काही गावात अद्यापही कोरोनाचा शिरकाव झाला नाही. कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखण्यात संबंधित ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. नरखेड तालुक्यातील वाढोणा गाव त्यापैकी एक. या गावात अजूनपर्यंत एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. यासोबतच कोविड प्रतिबंधात्मक नियमांची वर्षभर काटेकोरपणे अंमलबजावणी केली. तसेच प्रत्येक आठवड्यात गावात निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात आले. गावात जमावबंदी, गावबंदी असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. यात प्रत्येक ग्रामस्थांची निरंतर आरोग्य तपासणी करण्यात आली. या कामाचा गौरव जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे व पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील यांनी केला. ग्राम पंचायत कार्यालय येथे गावातील कोरोना योद्धा यांचा त्यांनी सत्कार केला. यावेळी आशा वर्कर साधना बाहे, अंगणवाडी सेविका बेबी बोडखे, गीता गायधने, सरपंच चंद्रकला प्रभाकर बनाईत, उपसरपंच चारुता झुडपे, ग्रामपंचायत सदस्य कांता निकाजू, वर्षा कथले, प्रभाकर बनाईत, राजेंद्र चापेकर, नितीन बनाईत, हरीश चापेकर, गीता गायधने, बेबी बोडखे, ग्रामविकास अधिकारी सुनील ईचे व गावातील नागरिक उपस्थित होते.
--
गावातील नागरिकांची वेळोवेळी कोरोनाची चाचणी करण्यात आली. शासनाने दिलेल्या सर्व नियमाचे गावकऱ्यांनी काटेकोरपणे पालन केले. ग्रामस्थ मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करतात. गर्दी टाळण्यासाठी गावात जमावबंदी लागू करण्यात आली. बाहेरच्यांना गावबंदी करण्यात आली. त्यामुळे गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही.
चंद्रकला बनाईत, सरपंच, वाढोणा.