काटोल/कुही/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/कामठी/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यांत करण्यात आलेल्या ३७५९ चाचण्यांपैकी ८४ (२.२३ टक्के) नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४२,१३७ कोरोनाबाधितांची नोंद झाली. १,३७,५९६ कोरोनामुक्त झाले तर २,२९४ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ग्रामीण भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,८४३ आहे.
सावनेर शहरात एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात प्रथमच एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. काटोल तालुक्यात २३० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. दोन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. यात कचारी सावंगा व येनवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कुही तालुक्यात ९० जणांची चाचणी करण्यात आली. तीत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. कळमेश्वर तालुक्यात ९ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात एक तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात नांदीखेडा येथे ३, साहुली (२), तेलगाव, खैरी हरजी, लोणारा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कामठी तालुक्यात १६७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रामटेक तालुक्यात दोन रुग्णांची नोंद झाली. दोन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८७ इतकी आहे.
हिंगणा तालुक्यात १५१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी व डिगडोह येथे प्रत्येकी ३, कान्होलीबारा (२) तर गिरोला, इसासनी, टाकळघाट, उमरी वाघ, वडधामना येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. उमरेड तालुक्यात २ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये शहरातील २ तर ग्रामीण भागातील एकही रुग्णाची झाली नोंद नाही.