नागपूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिली आहे. आता पुढचे सत्र २६ जूनपासून सुरू होणार आहे. परंतु यावर्षीही कोरोनामुळे शाळा २६ जून रोजी सुरू होणे कठीण आहे. सध्याची स्थिती बघता कोरोना लसीकरणानंतरच शाळा सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
गेल्या वर्षभरापासून प्राथमिक शाळा बंदच आहेत. मोजकेच दिवस माध्यमिक व उच्च माध्यमित शाळेचे वर्ग भरले होते. त्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला होता. पण शाळांना विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अवघड ठरले, अखेर शासनाने विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला. आता २६ जून रोजी नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात होणार आहे.
परंतु सद्या जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता आणि तिसऱ्या लाटेबाबत वैद्यकीय क्षेत्रातून मिळालेल्या अलर्टनुसार शाळा सुरू होणे शक्य नाही. एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शासनाने दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. यात मोठ्या संख्येने शिक्षकांनी लसीकरण करून घेतले. त्यानंतर शासनाने १८ वर्षावरील लसीकरणाचा निर्णय घेतला. परंतु राज्यात पडलेला लसींचा तुटवड्यामुळे १८ वर्षावरील लसीकरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. अजूनही अनेक शिक्षक लसीकरणापासून वंचित आहे. तिसरी लाटेत बालकांना संसर्ग होईल, असे बोलले जात आहे. पण बालकांच्या लसीकरणाबाबत कुठलेही निर्देश नाही. अशात शाळा सुरू करणे अवघडच होणार आहे.
- शिक्षण तज्ज्ञ म्हणतात...
तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग वाढेल असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण काही कमी झालेले नाही. त्यामुळे शाळा सुरू करताना सर्वच बाजूने विचार करावा लागणार आहे. शिक्षण विभाग त्यावेळची परिस्थिती बघूनच निर्णय घेईल.
- ७१ हजारावर विद्यार्थी थेट दुसरीत
१) कोरोनामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता वर्गोन्नती देण्याचा शासनाने निर्णय घेतला.
२) जिल्ह्यात ७१ हजारावर विद्यार्थी पहिलीत प्रवेशित झाले होते. ते यावर्षी शाळेत न जाता थेट दुसरीत गेले. पण यंदाही शाळा सुरू झाल्या नाही तर ते थेट शाळेत न जाता तिसरीत जातील.
- काय म्हणतात विद्यार्थी, पालक अन् शिक्षक
- गेल्या वर्षी काहीच दिवस शाळेत जाता आले. आमचे वर्षभर ऑनलाईन वर्ग झाले. पण ऑनलाईन शिक्षणापेक्षा वर्गात शिकविलेले जास्त लक्षात राहते. त्यामुळे शाळा लवकर सुरू व्हावी, अशी आमची इच्छा आहे. पण कोरोनाचीही भिती असल्याचे पालक म्हणतात.
- समीक्षा कुरडकर, विद्यार्थिनी ()
- वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालक चिंताग्रस्त आहे. सद्या वैद्यकीय क्षेत्रातून तिसऱ्या लाटेबाबत जे सांगितले जात आहे, ते भीषण आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे संपूर्ण लसीकरण केल्याशिवाय शाळा सुरू करणे म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.
मनोज चौरे, पालक ()
- कोरोनाने शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी क्षती निर्माण केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाळा नियमित सुरू व्हावे असे मनोमन वाटत असले तरी जीवापेक्षा काहीच महत्त्वाचे नाही. म्हणून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण केल्याशिवाय शाळा सुरू करणे उचित ठरणार नाही.
- राम पिल्लेवान, सहा. शिक्षक, परमानंद विद्यालय, व्याहाड ()
- यंदा सत्र ऑनलाईन की ऑफलाईन
कोरोनामुळे गेल्यावर्षी ऑनलाईनसह ऑफलाईनसुद्धा अध्यापन झाले. यावर्षी शैक्षणिक सत्र लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यावर शिक्षकांचा भर असणार आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतरच ऑफलाईन वर्ग होऊ शकेल.