कळमेश्वर : कोरोनामुळे आई किंवा वडील गमवालेल्या मुलांना इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण देणार, अशी माहिती कळमेश्वर पंचायत समिती येथे आयोजित कार्यक्रमात जैन संघटना नागपूर यांच्या पदाधिकारी यांनी दिली. याप्रसंगी उपसभापती जयश्री वाळके, जि. प. सदस्य पिंकी कौरती, माजी सभापती श्रावण भिंगारे, विजय भांगे, मालती वसू, गट विकास अधिकारी महेश्वर डोंगरे, गटशिक्षणाधिकारी मंगला गजभिये, बालविकास प्रकल्प अधिकारी दामोधर कुंभरे उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे अनेक मुलांनी पालकत्व हरवलेले आहे, तर काही मुले अनाथ झाली. घराचा कर्ता व्यक्ती गमावल्यामुळे आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. यात ग्रामीण भागात २५ व शहरी भागातील १० अशा ३५ मुलांचा समावेश आहे. यापैकी चार मुलांच्या नातेवाइकांनी जैन संघटनेसोबत शिक्षणासाठी पाठविण्यास संमती दर्शविली. जैन संघटना नागपूरच्या वतीने अशा मुलांना पाचवी ते बारावीपर्यंत पुणे येथील वाघोली येथे मोफत शिक्षणासह त्यांची राहण्याची, जेवणाचा खर्च करण्यात येणार आहे. तसेच मुलांना वर्षातून दोनवेळा स्वखर्चाने त्यांच्या जाण्यायेण्याचा खर्च जैन संघटना करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जैन संघटना सामाजिक क्षेत्रात काम करीत असल्याचे संघटनेच्या पदाधिकारी यांनी सांगितले. मुलांना निसंकोचपणे शिक्षण घेण्यासाठी पाठवावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.