नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. सद्य:स्थितीत रोज आढळणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या १००च्या आत आली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच ग्रामीणमध्ये सलग तिसऱ्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद झाली. १७ रुग्ण आढळून आले. मंगळवारी शहरात २८ रुग्ण व २ मृत्यूंची भर पडली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या ४६, तर मृतांची संख्या ३ झाली. आतापर्यंत कोरोनाचे ४,७६,४९१ रुग्ण व ९०१० मृत्यू झाले आहेत.
नागपूर जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यात बरे होणारे रुग्णही वाढत आहे. यामुळे शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या ९५ टक्क्यांवर खाटा रिकाम्या झाल्या आहेत. सध्या सर्वाधिक, ९७ रुग्ण मेडिकलमध्ये आहेत. मेयोमध्ये ३०, तर एम्समध्ये १२ रुग्ण उपचार घेत आहेत. बहुसंख्य खासगी रुग्णालयांत कोरोनाचे शून्य रुग्ण असून मोजक्याच रुग्णालयांत तीन ते पाच रुग्ण दाखल आहेत. आज ७८१८ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत ०.५८ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील पॉझिटिव्हिटीचा दर ०.५१ टक्के; तर ग्रामीणमध्ये ०.७० टक्के होता. २८१ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,६५,९४९ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९७.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोनाचे ३२२ रुग्ण विविध रुग्णालयांत
सध्याच्या स्थितीत विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात ३२२ रुग्ण उपचार घेत आहेत; तर १२१० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. एकूणच कोरोनाचे १५३२ रुग्ण आहेत. दिवसागणिक ही संख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेतील चिंतेचे वातावरण निवळले आहे; परंतु सार्वजनिक ठिकाणी व दुकानांमध्ये गर्दी वाढल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही वाढला आहे.
कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ७८१८
शहर : २८ रुग्ण व २ मृत्यू
ग्रामीण : १७ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७६,४९१
ए. सक्रिय रुग्ण : १५३२
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६५,९४९
ए. मृत्यू : ९०१०