नागपूर : कोरोनाबाधितांमध्ये आजारांची गुंतागुंत होत असते. त्यात आता जीवघेण्या ‘म्युकरमायकोसिस’ची भर पडलेली आहे. चेहऱ्याभोवतीच्या हाडांच्या पोकळीत म्युकरमायकोसिस नामक बुरशी वाढत असून, त्यामुळे डोळा प्रभावित झाला तर कायमचे अंधत्व येऊ शकते; मेंदू प्रभावित झाला तर प्रसंगी तो जीवघेणा ठरतो. अशा रुग्णांची संख्या इस्पितळांमध्ये वाढत आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस बुरशीचे वेळेत निदान होणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पूर्वी वर्षातून एखाद्दुसरा म्युकरमायकोसिसचा रुग्ण आढळायचा. मात्र आता हजार कोरोना रुग्णांमध्ये २० म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. दीर्घकालीन व अनियंत्रित मधुमेह, कर्करोग, कमी रोगप्रतिकारक क्षमता व एचआयव्ही रुग्णांना म्युकरमायकोसिस प्रभावित करते. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी अपरिहार्य स्टेरॉईड दिले जातात. ही औषधे बुरशी वाढण्यास कारणभूत ठरतात. नाकाच्या अवतीभोवती असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्येही म्युकरमायकोसिस या बुरशीची वाढ होते. ही बुरशी कालांतराने दात, हिरड्या, डोळे व मेंदूपर्यंत पसरत जाते. जेथे-जेथे ही बुरशी पसरते, तो भाग सडायला लागतो. सडलेला भाग पुन्हा बरा होऊ शकत नाही; तो काढावाच लागतो. एकदा का बुरशीची वाढ मेंदूत होऊ लागली की, रुग्णांची स्थिती गंभीर होऊ लागते व मृत्यूचा धोका वाढतो. दात, हिरड्या या अवयवांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रभाव झाला तर शस्त्रक्रिया करून तो भाग काढून टाकला जातो. डोळ्यांपर्यंत म्युकरचा प्रभाव वाढला तर मेंदूपर्यंत तो पोहोचू नये म्हणून डोळा काढण्याची वेळ येते.
-आजाराची लक्षणे
कोविड रुग्णांमध्ये निरंतर डोके दुखणे, दात दुखणे व हलणे, हिरड्यांमध्ये वेदना, टाळूवर काळसरपणा व वेदना, चेहऱ्यावर वेदना, नाकातून काळा स्राव जाणे, डोळा दुखणे, डोळ्यांभोवती सूज, पापणी आपोआप खाली पडणे, डोळ्यांच्या भोवताली दुखणे ही म्युकरमायकोसिसची पूर्व लक्षणे असू शकतात.
-लक्षणांकडे दुर्लक्ष नको
कोरोना उपचारादरम्यान स्टेरॉईडचा वापर, ज्यांची रक्तशर्करा (ब्लड सुगर) पातळी जास्त असणे, इम्युनिसप्रेसंटचा वापर केला तर, अशा रुग्णांनी स्वत:च्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष ठेवावे. म्युकरमायकोसिस लक्षणे सुरुवातीला सामान्य वाटत असतात. मात्र, ती आढळली तर तातडीने कान-नाक-घसा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे
कान-नाक-घसा तज्ज्ञ, मेयो
-मेंदूत पोहोचल्यास रोग जीवघेणा
बुरशी मेंदूपर्यंत पोहोचली तर जीवघेणी परिस्थिती निर्माण होते. जेथे बुरशी लागलीय, तो मेंदूचा भाग काढून टाकावा लागतो. फंगल मेनिंंजायटिसच्या परिस्थितीत जीव वाचविणे कठीण होऊ शकते. मात्र वेळेत उपचार घेतल्यास मेंदूवरील प्रभाव टाळून रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. त्यासाठी लवकर निदान होणे आवश्यक आहे.
डॉ. निनाद श्रीखंडे
न्यूरोसर्जन