लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कौशल्यप्राप्त डॉक्टर घडविण्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध तसेच विविध आजाराच्या कारणासंबंधी संशोधन होणे गरजेचे असते. यासाठी देहदान महत्त्वाचे ठरते. परंतु देहदानाला कोरोना चाचणीची अट घालून दिल्याने या वर्षी कमी देहदान झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील वर्षी ३७ देहदान झाले होते. या वर्षी २० देहदान झाले आहेत.
वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात चांगले डॉक्टर बनावेत, यासाठी त्यांना प्रात्यक्षिक अभ्यासासाठी मानवी मृतदेहाची गरज असते. देहदानामुळे हे मृतदेह मिळू शकतात. नागपुरात पूर्वी या दानाला घेऊन उदासीनता होती. परंतु जनजागृतीमुळे हळूहळू देहदानाची संख्या वाढू लागली. गेल्या वर्षी मेडिकलला जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये ३७ देहदान झाले होते. यात २७ पुरुष व १० महिलांचे मृतदेह होते. या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच याचा फटका देहदानालाही बसला. जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत २० देहदान झाले. यात १३ पुरुष व ७ महिलांचे मृतदेह आहेत. कमी देहदानामुळे जुन्या मृतदेहांची मदत घेतली जाणार असल्याचे येथील एका अधिकाऱ्याने सांगितले.
- शिक्षणासाठी १० विद्यार्थ्यांमागे १ मृतदेह
मेडिकलमध्ये गेल्या वर्षीपासून एमबीबीएसला २५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. शरीररचनाशास्त्र विभागाच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह असणे गरजेचे असते. परंतु या वर्षी केवळ २० मृतदेह मिळाल्याने अडचणीचे जाणार आहे. जुने मृतदेह असले तरी त्यावर वारंवार प्रात्यक्षिक होत असल्याने ते खराब झालेले असतात.
- देहदानाला नैसर्गिक मृत्यूचा दाखल्याची अडचण
नागपूरचे मेयो, मेडिकल सोडल्यास इतर शासकीय व खासगी रुग्णालयाला नेहमीच देहदानाची प्रतीक्षा असते. या दानाला नैसर्गिक मृत्यूच्या दाखल्याची आडकाठी येत असल्याचे समोर आले आहे. ‘बॉम्बे अॅनाटॉमी अॅक्ट १९४९’नुसार मृतदेह स्वीकारण्याकरिता नैसर्गिक मृत्यूच्या दाखल्याची गरज असते. परंतु अनेक डॉक्टरांकडून हा दाखला मिळण्यास अडचण जात असल्याने नातेवाईकांची इच्छा असूनही देहदान होत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत.
- महाविद्यालयांनी ‘आरटीपीसीआर’साठी पुढाकार घ्यावा
घरी नैसर्गिक मृत्यू झालेल्या मृतदेहाची आरटीपीसीआर चाचणी करणे नातेवाईकांसाठी अडचणीचे ठरू शकते. कोरोनाच्या चाचणीसाठी देहदान नाकारणेही योग्य नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शासनाने यात लक्ष घालणे आवश्यक आहे.
- चंद्रकांत मेहर
अध्यक्ष, देहदान सेवा संस्था