लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो लोकांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात ८ हजार ९४९ लोकांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील ५ हजार २६३, जिल्ह्यातील २ हजार २९७ तर जिल्ह्याबाहेरील १ हजार ३८९ जणांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रकोप सुरू असताना एप्रिल महिन्यात नागपूर शहरातील दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागत होती. याचा मनपाच्या आरोग्य विभागावर प्रचंड ताण होता. अंत्यसंस्कारासाठी मनपाला १ कोटी ६० लाखाचा खर्च करावा लागला.
....
एका अंत्यसंस्कारावर २,४०० रुपये खर्च
महापालिकेच्या दहनघाटावर अंत्यसंस्कार मोफत केले जातात. यासाठी लागणारे लाकूड, गोवऱ्या, ब्रिकेट मोफत उपलब्ध केले जाते. तसेच चार दहनघाटावर डिझेल व गॅस शवदाहिनीची व्यवस्था आहे. यावर मनपाला खर्च करावा लागतो. कोरोनामुळे नागपूर शहरात ५ हजार २६३ जणांचा मृत्यू झाला. तर जिल्ह्याबाहेरील १ हजार ३८९ जणांचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील बहुसंख्य मृतांवर नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनपाच्या दहनघाटावर एका अंत्यसंस्कारासाठी २,२०० ते २,४०० रुपये खचं येतो.
....
१०० कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
कोरोनामुळे उपचारादरम्यान वा गृहविलगीकरणात असताना मृत्यू झाल्यास मनपाच्या आरोग्य (स्वच्छता) विभागातर्फे अंत्यसंस्कार केले जातात. यासाठी १०० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय, खासगी रुग्णालये तसेच गृहविलगीकरणातील मृतांवर अंत्यसंस्कार मनपानेतर्फे केले जातात.
....
मोफत अंत्यसंस्काराची सुविधा
मनपाच्या सर्व दहनघाटावर मोफत अंत्यसंस्काराची सुविधा आहे. मृतांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. शहरात दररोज सरासरी २,२०० केले जातात. परंतु कोरोनामुळे मृतांची संख्या वाढली आहे. यामुळे अंत्यसंस्कारावरील खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दहनघाटावर लाकूड, गोवऱ्या मोफत दिल्या जातात. शवदाहिनीचा खर्च मनपातर्फे केला जातो.
डॉ. प्रदीप दासरवार उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, मनपा
....
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित - ४,७५,५९६
बरे झालेले -४,६२,३५२
सध्या उपचार घेत असलेले -४,२९५
एकूण मृत्यू -८,९४९