नरखेड : गणेशोत्सव तीन आठवड्यांवर आला आहे. गणरायाच्या आगमनाची सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. मूर्तिकारही मातीच्या मूर्तींमध्ये देवपण आणण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. पण यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मूर्तिकार चिंतेत आहेत.
पारंपरिक मूर्तिकार नवनव्या थाटणीच्या, चालू घडामोडीवर आधारित, आरोग्य विषयक जागृतीपर मूर्ती तयार करून गणेश मंडळांना विकायचे. यंदाही चार फुटाच्यावर मूर्ती तयार करायला परवानगी नसल्याने लहान मूर्ती तयार करण्यावर भर दिला जात आहे. मोठ्या मूर्ती तयार करायच्या नसल्यामुळे मूर्तिकारांचे व्यावसायिक गणित बिघडले आहे. दुसरीकडे घरगुती गणेशाची स्थापना करणारे व कोरोना कालावधीत प्रत्येक वस्तूची ऑनलाईन बुकिंग करण्याची सवय पडलेले भाविक युट्यूब वरून गणेशाची प्रतिमा डाऊनलोड करून आम्हांला अशी मूर्ती तयार करून घ्या अशी मागणी करीत आहेत. लोकांच्या मागणीत बदल झाला आहे. भाविक मूर्तीच्या देखाव्यावर अधिक भर देत आहेत. त्यामुळे स्वतःची कलाकुसर, कल्पनाशक्ती गहाण ठेवल्यासारखे वाटत असल्याची भावना येथील मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.
पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींना बंदी असतानासुद्धा त्या विकल्या जातात. त्यावर करण्यात आलेली रंगरंगोटी आकर्षक असल्यामुळे ग्राहक तशाच प्रकारच्या मूर्तीची मागणी करतात. पीओपीपासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींना खर्च, वेळ कमी प्रमाणात लागतो. शाडूमातीपासून मूर्ती तयार करणे अतिशय खर्चिक असून रंग व मेहनत खूप लागते. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी शाडू माती या अगोदर ४,५०० रुपये प्रति टेंपो मिळायची. ती आता ७,५०० रुपयाला मिळते. पूर्वी खडेरहीत माती मिळायची. आता त्यातही भेसळ होत आहे. परिणामी मूर्ती घडविताना वेळ वाया जातो. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या झळाही या पारंपरिक व्यवसायाला बसत आहे. नरखेड शहरातील ६ कुटुंबांतील ३० व्यक्ती गणेश मूर्तीपासून दिवाळीपर्यंत लक्ष्मीच्या मूर्ती निर्माण करण्याचे काम करून वर्षभराची गुजराण करतात.
कोरोना महामारी अगोदर लहान-मोठ्या ६००ते ७०० मूर्ती विकल्या जायच्या. त्यापासून ५.५० लाख रुपयांपर्यंत मिळकत व्हायची. आता ती अर्ध्यावर आली आहे. त्यामुळे पारंपरिक मूर्तिकारांवर उपासमारीची पाळी आली आहे. पारंपरिक कारागीर म्हणून संचारबंदी काळात शासनाकडून कोणतीच मदत मिळाली नाही अशी खंतही मूर्तिकारांनी याप्रसंगी व्यक्त केली. तालुक्यात एकूण ६५ नोंदणीकृत गणेश मंडळे आहेत. गावपातळीवर गणेश उत्सव साजरे केले जायचे. पण कोविड प्रतिबंधात्मक नियमामुळे गणेश मंडळाचा उत्साह कमी झाला आहे. निर्विघ्नपणे उत्सव साजरा करण्यासाठी मंडळावरील निर्बंध हटल्यास पूजा साहित्य विकणारे, मंडप डेकोरेशन, बँड पथक, कॅटरिंगचा व्यवयाय करणाऱ्यांनाही रोजगार मिळू शकतो. मात्र, तिसऱ्या लाटेच्या अंदाजामुळे सारेच चिंतीत आहेत.
-
दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे आमचे जगण्याचे तंत्रच बिघडले आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. मूर्तींची मागणी कमी झाली. त्यामुळे कुटुंबीयांचे पालन पोषण कसे करावे हा प्रश्नच आहे.
- मनोज डहाणकर, मूर्तिकार, नरखेड.
----
लग्नसराई संपल्यानंतर एक-दोन महिन्यांच्या सवडीने दुसरा हंगाम म्हणून गणेशत्सव सुरू व्हायचा. एकाच उत्सवात दहा ते पंधरा ठिकाणी पेंडॉल, डेकोरेशन, रोषणाईकरीता काम मिळायचे. २० ते २५ मजुरांना रोजगार मिळायचा. पण कोरोना निर्बंधामुळे सर्वकाही ठप्प आहे.
- विपुल बालपांडे, डेकोरेशन संचालक, नरखेड.
-----
लग्न समारंभ, गणेशोत्सव असो वा महालक्ष्मी. आप्त स्वकीयांना भोजन ठरलेले असायचेच. मात्र, दीड वर्षापासून संचारबंदीमुळे सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध आले आहेत. दोनदा संचारबंदी वेळोवेळी घेतलेला अग्रीम परत करावा लागला. यातून मी ५० ते ६० लोकांना रोजगार द्यायचो. आता मीच बेरोजगार झालो आहे.
- दुर्गेश डांगरे, कॅटरिंग व्यावसायिक, नरखेड