लोकमत विशेष
नागपूर : कोरोनामुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. अन्य धार्मिक यात्रांसोबतचयंदा हज यात्राही झाली नाही. कोरोनाचा परिणाम आता पुढील वर्षी होणाऱ्या हज यात्रेवरही दिसत आहे. केंद्रीय अल्पसंख्यक मंत्रालय आणि केंद्रीय हज समितीने आगामी हज यात्रेसाठी अर्जप्रक्रिया सुरू केली आहे. ही अंतिम तारीख १० डिसेंबर होती. मात्र अर्ज अत्यंत कमी आले. त्यामुळे समितीने ही मुदत आता १० जानेवारीपर्यंत वाढविली आहे.
कोरोनाचा हज यात्रेवर पडलेला परिणाम महाराष्ट्रातही दिसत आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी आतापर्यंत फक्त ५ हजार १७६ लोकांचेच अर्ज आले आहेत. मागील वर्षी अर्जांची संख्या २८ हजार ७०० होती. मात्र कोरोनामुळे हज यात्रा रद्द झाली होती. २०१९ मध्ये ३५ हजार ८७७ लोकांनी अर्ज केले होते. २०२०च्या तुलनेत पुढील वर्षी होणाऱ्या यात्रेसाठी एक तृतियांश अर्ज आले आहेत. हज यात्रा महागणे हे यात महत्वाचे कारण सांगितले जात आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे हज यात्रेकरूंच्या जागा सरकारने घटविल्या होत्या. मात्र आता खर्च कमी झाल्यासंदर्भात सर्क्युलर जारी करण्यात आले आहे.
कोरोनामुळे जागांचा कोटा एक तृतियांश करण्यात आला. यामुळे खर्च वाढला होता. परंतु आता केंद्रीय हज समितीने सर्क्युलर काढून खर्च कमी केला आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या यात्रेकरूंना आता फक्त ३,२९,२८० रुपयांचा खर्च येणार आहे. त्यांना मुंबईहून रवाना केले जाईल.
- इम्तियाज काजी, मुख्य कार्यकारी अधिकारी
नागपुरातून फक्त २४१ अर्ज
आगामी हज यात्रेसाठी राज्यभरातून ५ हजार १७६ अर्ज आले आहेत. त्यात नागपुरातील २४१ अर्जांचा समावेश आहे. २०२०मध्ये नागपुरातून १,४६९ अर्ज होते. तर २०१९ मध्ये ही संख्या १,८५२ होती.
...