लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत चालली आहे. सोमवारी एका २९ वर्षीय युवकाच्या मृत्यूची नोंद झाली. मृताची संख्या चारवर पोहचली आहे तर आज पुन्हा दोन रुग्णांचे निदान झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २९८ झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे, चार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारादरम्यान मृत्यू झालेला रुग्ण हा पांढराबोडी येथील रहिवासी होता. ६ मे रोजी हा रुग्ण मेडिकलमध्ये भरती झाला. या रुग्णाला ‘सारी’ म्हणजे तीव्र श्वसनाचे विकार, वैद्यकीय भाषेत ‘ सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ होता. दारूच्या व्यसनामुळे रुग्णाचे यकृत निकामी झाले होते. या शिवाय रुग्णाला क्षयरोगही होता. या रुग्णाची कोविड विषाणूची चाचणी केली असता ७ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, या रुग्णासोबतच शताब्दीनगर व मोमीनपुरा येथील रहिवासी असलेला ‘सारी’चा रुग्ण पॉझिटिव्ह आला. या तिघांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना पांढराबोडी येथील रुग्णाचा मृत्यू झाला. या मृत्यूने नागपुरात मृतांची संख्या चार झाली आहे.पॉझिटिव्ह रुग्णामुळे दोन खासगी हॉस्पिटल अडचणीतमोमीनपुरा येथील रहिवासी ५० वर्षीय महिलेला मूत्रपिंडांचा आजार असल्याने प्रथम तिने शंकरनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. येथून ही महिला रुग्ण डिगडोह येथील खासगी रुग्णालयात भरती झाली. येथे तिच्यावर डायलिसीस सुरू होते. या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयाने तिचा नमुना मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविला. आज पॉझिटिव्ह अहवाल येताच खळबळ उडाली. या रुग्णाला तातडीने मेयो येथे हलविण्यात आले. मात्र दोन्ही खासगी हॉस्पिटल अडचणीत आले आहे. या रुग्णाचा संपर्कात आलेल्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या शिवाय, आणखी एक रुग्ण मेडिकलच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला. मोमीनपुरा येथील हा ३० वर्षीय पुरुष रुग्ण असून तो वनामती येथे क्वारंटाईन होता. या रुग्णाला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले.‘सारी’चा पहिला मृत्यू‘सारी’ असलेल्या पहिल्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, आज ‘सारी’चे आणखी नऊ रुग्ण मेडिकलमध्ये भरती झाले. या रुग्णांसह या आजाराच्या रुग्णांची संख्या १४ झाली आहे. यात १० पुरुष तर चार महिला आहेत. या रुग्णांवर मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ‘कोविड’ चाचणीसाठी यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.पाचव्या दिवसांत दुसरा मृत्यूनागपुरात पहिल्या कोरोनाबाधित सतरंजीपुरा येथील ६८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. मृत्यूनंतर या रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर १७ व्या दिवशी मोमीनपुरा येथील ७० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाचा मृत्यूनंतर १५ व्या दिवशी पार्वतीनगर येथील २२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला तर तिसऱ्या मृत्यूनंतर पाचव्या दिवशी चौथ्या मृत्यूची नोंद झाली आहे.मेयोतून तीन तर मेडिकलमधून एक रुग्ण कोरोनामुक्तमेयोतील तीन तर मेडिकलमधील एका रुग्णाचा १४ व्या दिवशीचा नमुना निगेटिव्ह आल्याने सतरंजीपुरा येथील चारही जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या आता ९६ झाली आहे. मेयोमधून बरे झालेल्यांमध्ये ५० वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला व १७ वर्षीय मुलगा आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित ११७दैनिक तपासणी नमुने १४०दैनिक निगेटिव्ह नमुने १३८नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने २९८नागपुरातील मृत्यू ४डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ९६डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १७१७क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २३२२पीडित-२९८-दुरुस्त-९६-मृत्यू-४
CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा चौथा मृत्यू , दोन नव्या रुग्णाची नोंद : रुग्णसंख्या २९८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:12 AM
एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत चालली आहे. सोमवारी एका २९ वर्षीय युवकाच्या मृत्यूची नोंद झाली. मृताची संख्या चारवर पोहचली आहे तर आज पुन्हा दोन रुग्णांचे निदान झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २९८ झाली आहे.
ठळक मुद्देचार रुग्ण कोरोनामुक्त