- पॉझिटिव्ह स्टोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या महाभयंकर वावटळित जगताना लॉकडाऊनने सगळ्या क्रीया थबकल्या आहेत. विशेष म्हणजे, याचा सर्वात जास्त दुष्परिणाम कलाक्षेत्राला भोगावा लागत आहे. रसिकांची गर्दी उसळवणारे क्षेत्र म्हणून सर्वांत आधी सांस्कृतिक क्षेत्राला टाळे लावले गेले आणि अनलॉक प्रक्रियेतही सगळ्यांत शेवटी टाळे उघडले जाणार, हे निश्चित. अशावेळी करावे काय, हा प्रश्न सांस्कृतिक क्षेत्राला आहे. मात्र, लॉकडाऊनने कृतीला बंधने घातली असली तरी अभिव्यक्तीला नव्हे, हे आविष्कार रंगकर्मींनी दाखवून दिले आहे.
कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेत दीर्घकाळ टाळेबंदीने हतबल झालेल्या सांस्कृतिक क्षेत्रात अनेक कलावंतांना विनारोजगार गुजराण करावी लागली. टाळेबंदीची शिथिलता जोवर नाट्यक्षेत्राला लागू होत नाही तोवर दुसऱ्या लाटेने थैमान घातले आणि पुन्हा टाळेबंदीने उरली सुरली कंबर मोडून टाकली. अशावेळी अनेक संस्था शांत बसल्या आहेत. मात्र, याचवेळी काही संस्था व कलावंतांच्या समूहाने क्रिएटिव्ह वर्क हाती घेत, मिळालेल्या उसंत काळात संधी शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यात कुणी अस्थाई रंगमंचाची उभारणी केली, तर कुणी नव्या लेखकांच्या नाट्यसंहिता मागवून त्याचे संच तयार करण्यास सुरुवात केली आहे.
------------------
सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी आणि म्हणून बंधनेही जास्त
सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची गर्दी उसळत असते. त्यामुळे, लॉकडाऊनच्या दिशानिर्देशात सर्वप्रथम सांस्कृतिक क्षेत्र येते आणि शिथिलतेचे नियम सर्वांत शेवटी लागू होतात. पहिल्या लॉकडाऊनमध्ये हा अनुभव सगळ्यांनी घेतला. त्याची पुनरावृत्ती दुसऱ्या लॉकडाऊनच्या शिथिलतेतही होण्याची शक्यता आहे.
-----------
हेमेंदू रंगभूमी - अस्थाई रंगमंचाची उभारणी
लॉकडाऊन काळात हेमेंदू रंगभूमीने सर्व हौशी रंगकर्मींसाठी म्हणून गोपाळकृष्णनगर, वाठोडा येथे अस्थाई रंगमंचाची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊन काळात नाटकांच्या तालमी होणार नसल्याने स्व:खर्चातून व समाजातील काही दानदात्यांच्या मदतीने हे कार्य सुरू केले आहे. लॉकडाऊन उठताच येथे नाट्यविषयक उपक्रमांना गती येणार आहे.
----------
बहुजन रंगभूमी - गौतम बुद्धांवर आधारित नव्या एकांकिका लिखाणाला प्रोत्साहन
लाॅकडाऊन काळात बहुजन रंगभूमीची कामे सातत्याने सुरू होती. त्याच श्रुुंखलेत गौतम बुद्ध यांच्या जीवनचरित्र व विचारांवर आधारित नव्या नाट्यसंहिता लिखाणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन दिले जात आहे. त्याआनुषंगाने विशेष स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
-------------
बालरंगभूमी परिषद-बच्चे कंपन्यांसाठी विविध ऑनलाइन उपक्रम
१४ महिन्यांपासून घरी असलेल्या मुलांमध्ये नैराश्य पसरू नये म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची फळी असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या वतीने मुलांसाठी विविध ऑनलाइन उपक्रम राबविले जात आहेत. नाट्य, अभिनय, गायन, चर्चासत्र, क्रिएटिव्ह वर्क असे सेशन्स सातत्याने घेतले जात आहेत.
--------------
आर्ट लॅब - ऑनलाइन एकांकिकांचे वाचन व संहिता संवर्धन
आर्ट लॅबच्या गौरव खोंड यांच्या संकल्पनेतून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये तब्बल ९० दिवस नव्या व स्थानिक लेखकांच्या नाट्यसंहितांचे वाचन करण्यात आले होते. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये गेल्या २५ दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे. विशेष म्हणजे, या सर्व संहितांचे संवर्धनही केले जात आहे.
.....................