लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्ग आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर एकाच बाजारातील गर्दीला टाळण्याच्या हेतूने मनपा प्रशासनाने शहराच्या वेगवेगळ्या भागात पहाटेच्या सुमारास छोटे छोटे बाजार भरविण्याचा निर्णय घेतला. याला नागरिकांनीही उदंड प्रतिसाद दिला. मात्र, आता याच बाजारातून कोरोनाला सहजगत्या आमंत्रण दिल्या जात असल्याचे पुढे येत आहे. शहरातील ५० हून अधिक बाजारातून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे.पूर्व नागपुरात केडीके कॉलेजपुढील गोराकुंभार चौक, दिघोरी उड्डाणपूल, हुडकेश्वर अशा वेगवेगळ्या भागात छोटे छोटे बाजार पहाटे चार-साडेचार वाजतापासून भरण्यास सुरुवात होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून येणारा माल थोडथोडक्या स्वरूपात उतरवला जातो. आता कळमना, कॉटन मार्केटमध्ये जाण्याचा त्रास वाचल्याने सोयीस्कर म्हणून नागरिकही सकाळपासूनच या बाजारांमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. मात्र, ही गर्दीच नागरिकांच्या जीविताला धोका उत्पन्न करणारी ठरत आहे. दिघोरी चौकात भाजीविक्रीचा व्यवसाय करणारे आठ तरुण कोविड पॉझिटिव्ह आल्याने हा धोका आणखीनच बळावला आहे. असे असतानाही भाजीविक्रेते म्हणा वा ग्राहक कुठलेच निर्बंध न पाळता मनसोक्त गर्दीमध्ये उतरून खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असल्याचे दिसून येते. हे व्यवहार करताना कुणाजवळच सॅनिटायझर दिसत नाही, हातमोजे नाही आणि मास्क तर केवळ दाखविण्यापुरतेच असल्याचे दिसते. फिजिकल डिस्टन्सिंगचा तर दूरदूरचा संबंध नाही, अशा स्थितीत कोरोना कसा आटोक्यात येणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या दोन दिवसापासून गोराकुंभार चौकात भरणाऱ्या बाजाराचे निरीक्षण केले असता हा प्रकार प्रकर्षाने जाणवत आहे. याच बाजारातील एका भाजीविक्रेत्यास विचारले असता... ‘अरे कुछ नहीं होता, कोरोना बिरोना सब बकवास है’ असे बिनधास्त बोल कानावर पडले! विक्रेतेच असे मुजोरीचे धोरण अवलंबीत असतील तर, याला उत्तर काय, असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे, या परिसरात गेल्या तीन दिवसात चार-पाच कोविड रुग्ण आढळून आले आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी ना मनपा प्रशासनाचे कर्मचारी दिसतात ना पोलिसांचा ताफा दिसतो. या स्थितीमुळे कोरोनाचा धोका प्रचंड वाढला आहे.शहरात ५० हून अधिक भरतात बाजारनागपूर शहरातील विविध भागात ५० हून अधिक छोटे-मोठे बाजार भरतात. त्यातील काही बाजार आठवडी आहेत तर काही रोजच भरतात. एकाच ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून आठवडी बाजार बंद करून महानगरपालिकेने छोटे बाजार वाढविले आहेत. त्यांच्या जागाही नेमून दिल्या आहेत. मात्र काही छोटे बाजार हे रस्त्याच्या कडेलाच रोज भरतात. या बाजारांमध्ये कुठलीही सजगता पाळली जात नाही. सॅनिटायझरचा उपयोग केला जात नाही. मास्क नावालाच असतो. फिजिकल डिस्टन्सिंग कुठेच दिसत नाही. त्यामुळे संसर्ग वाढून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
हा तर ‘कोरोना’चा बाजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:56 AM